महाराष्ट्रातील वसईची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकरचा तिचा प्रियकर आफताब पुनावालाने दिल्लीत खून केला आणि ३५ तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट लावली. या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा चढला आहे. भाजपाच्या काही नेत्यांकडून हे प्रकरण लव्ह जिहादचं असल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी होत आहे. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रद्धा वालकरने महाराष्ट्र पोलिसांकडे केलेल्या जुन्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करत महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते गुरुवारी (२४ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांना भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या लव्ह जिहाद आरोपाविषयी विचारले असता त्यांनी हे प्रकरण मला जास्त माहिती नाही, असं मत व्यक्त केलं.

“महिलांवरील वाढत्या अत्याचारावर राष्ट्रवादी पक्षाचं धोरण ठरवणार”

श्रद्धा वालकर खून आणि महिलांवरील अत्याचार यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “आज आमच्या पक्षाची एक अंतर्गत बैठक होत आहे. या बैठकीत वाढती महागाई, राज्यात आणि देशात महिलांवर वाढते अत्याचार यावर आम्ही चर्चा करणार आहोत. त्यावर काही कार्यक्रम ठरवण्याविषयी आणि या मुद्द्यांवर धोरण ठरवण्यासाठी आम्ही पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेणार आहोत.”

हेही वाचा : Photos : श्रद्धा हत्येप्रकरणी आफताबने कबुलीजबाब फिरवला तर? माजी DGP म्हणाल्या, “मी नेहमी सांगायचे…”

“हा विषय गंभीर, त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही”

“हा विषय खूप गंभीर आहे. त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही,” असं म्हणत शरद पवारांनी श्रद्ध वालकर खून प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं.

हेही वाचा : Photos : दिल्लीत श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, देहरादूनमध्ये अनुपमाचे ७२ तुकडे; दोन्ही प्रकरणांमध्ये नेमकं काय साम्य?

फडणवीसांच्या आरोपावर शरद पवारांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रद्धा वालकरने मविआ सरकारच्या काळात लिहिलेल्या पत्रावर कारवाई झाली असती, तर श्रद्धा वालकरचा जीव वाचला असता असं वक्तव्य केलं. त्यावर प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, “आज राज्यात भाजपाचं सरकार आहे. राज्याचं गृहखातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यामुळे फडणवीसांनी मागे काय झालं त्यावर बोलण्याऐवजी आजच्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on shraddha walkar murder case answer devendra fadnavis pbs