राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते व उपमुख्यमंत्री अजित पवारांची बैठक झाली. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांना भाजपाबरोबर येण्याचा किंवा तटस्थ राहण्याचा प्रस्ताव दिल्याचीही चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी शरद पवारांना विचारणा केली. यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (१६ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आम्ही राजकीय चर्चा केलीच नाही. माझ्याशी कोण चर्चा करणार आहे. ज्या पक्षात हे सर्व नेते होते त्या पक्षाचा संस्थापक कोण आहे. त्या पक्षाचा वरिष्ठ व्यक्ती कोण आहे. यात आणखी कुणी चर्चा करायला येईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्याला कुणीही महत्त्व देण्याचं काहीही कारण नाही.”

“मी मोदींचं गुणगान गायलं आहे का?”

पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांनी मोदींविरोधात लढण्याची भूमिका स्पष्ट करून संभ्रम दूर करण्याची मागणी केली. त्याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, “मी माझ्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच मोदींचं गुणगान गायलं आहे का. माझं म्हणणं सर्वांनी ऐकलं आहे.”

“मी पवार कुटुंबाचा प्रमुख आहे”

“पवार कुटुंबातील आम्ही एकंदर जे सर्व भाऊ आहोत, बहिणी आहोत त्या कुटुंबाचा प्रमुख मी आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबात एक पद्धत आहे की, कुठलाही कौटुंबिक प्रश्न असेल, तर माझ्याशी बोलतात, माझा सल्ला घेतात. त्यासाठी कुणी आलं असेल, तर त्याचा अधिक किस काढण्याचं काही कारण नाही,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : टोलनाकाफोडीवरून अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“तुमच्या गुप्त भेटीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाने वेगळा प्लॅन केलाय का?”

तुमच्या गुप्त भेटीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाने वेगळा प्लॅन केलाय का? राष्ट्रवादीला बाजूला ठेऊन काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येणार आहे का या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादीला बाजूला ठेऊन काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येणार अशी चर्चा आहे, पण ही वस्तूस्थिती नाही. तुम्ही आजचं संजय राऊत यांचं वक्तव्य वाचलं असेल, तर या सगळ्या गोष्टी असत्यावर आधारित आहेत, असं त्यांनी निवेदन दिलं आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on speculations of proposal by ajit pawar in meeting pbs