Sharad Pawar on Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. तसंच, एकनाथ शिंदेंमुळे ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने गेल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“ठाणे महानगरपालिकेत संजयसाहेब होते, रांगणेकर होते. अहिल्याबाई होत्या की नाही हे आता आठवत नाही. अनेक लोक त्याठिकाणी होते. ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, त्या प्रयत्नात मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी एकनाथ शिंदेंकडे होती. मला आनंद आहे की आज त्यांचा या ठिकाणी सत्कार आहे. सातारने बरेच मुख्यमंत्री दिले. मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री सातारचा होता. सातारला कूपर नावाची कंपनी आहे, त्या कंपनीचा मालक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण झाले. पृथ्वीराज चव्हाण, त्यानंतर एकनाथ शिंदे झाले. मला आनंद आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना दिली. त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्वच केलं असं नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र पुढे कसा जाईल, याची काळजी घेतली”, असंही शरद पवार म्हणाले.

नागरी प्रश्नांची जाण असलेला नेता

“नागरी प्रश्नांची, समस्यांची जाण असलेला नेता कोण, याची माहिती घेतली तर त्यासाठी एकनाथ शिंदेंचं नाव घ्यावं लागेल. ठाणे, ठाणे महानगरपालिका, मुंबई येथील समस्यांची त्यांना जाण आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनाही जाण आहे. योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं. हे करत असताना विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेवून प्रश्नाचा तोडगा काढण्याचं काम त्यांनी केलं. याची नोंद महाराष्ट्राच्या राजनीतीच्या इतिहास राहील. त्यानिमित्ताने त्यांचा सन्मान होतोय, याचा मला आनंद आहे”, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यामुळे आधीच राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच, ठाण्यातील राजकारणाचं श्रेयही शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना दिल्याने संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य केलं.

संजय राऊतांचं प्रत्युत्तर काय?

संजय राऊत म्हणाले, “कदाचित शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या तीस वर्षांत शिवसेनेने केलं. ठाण्याचा विकास सतीश प्रधान यांनी केली. त्यांनी टेंडरबाजी केली नाही. त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशीरा आले. शरद पवारांना माहिती हवी असेल तर आमचे ठाण्याचे प्रमुख राजन विचारे त्यांना माहिती पुरवतील. आम्ही त्यांना सर्व फाईल्स घेऊन पाठवू. एकनाथ शिंदे फार उशिरा आमदार झाले अन् विधानसभेत आले. त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली.”

Story img Loader