राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तसेच महाराष्ट्राविषयी बोलताना वादग्रस्त विधान केल्यामळे राज्यात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कोश्यारी यांना राज्यपालपदावरून दूर करावे तसेच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण यात काहीही फरक नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. टीव्ही ९ मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हेही वाचा >> राज्यपालांच्या विधानावर संभाजी छत्रपतींनी नोंदवाला आक्षेप, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली ‘ही’ मागणी
“या राज्यपालांबद्दल काय बोलावं. यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत एक भयानक विधान केले होते. त्यांनी यावेळी वेगळ्या पद्धतीने तीच पुनरावृत्ती केली. महाराष्ट्र किंवा मुंबईबद्दल त्यांनी भाष्य केले. मुंबई किंवा महाराष्ट्र सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे आहेत. मुंबईची प्रगती सर्वसामान्यांच्या कष्टातून झाली. असे असताना अशा प्रकारची विधाने करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. मी याच्या फार खोलात जात नाही. कारण राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंत:करण यात काही फरक नाही,” असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा >> दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी, राज्य सरकारची घोषणा
राज्यपालांनी केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे.” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.