मुंबईत कामगारांच्या नेत्याने घडवून आणलेल्या संपामुळे कापड गिरण्या बंद पडल्या आणि दोन लाख कामगार देशोधडीला लागले. आता ज्यांचा गुंठाभर ऊस पिकत नाही, अशी मंडळी शेतक-यांच्या संघटना काढून ऊस आंदोलन करीत साखर कारखाने बंद पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. साखर कारखानदारी बंद पडली तर मुंबईतील गिरणी कामगारांप्रमाणे ऊस उत्पादक शेतकरीही उद्ध्वस्त होतील, अशी भीती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. साखर कारखानदारी बंद पाडू पाहणाऱ्या अशा मंडळींचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीत हाणून पाडा व त्यांना खडय़ासारखे बाजूला काढा, असे आवाहनही त्यांनी केले.
माढा लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी टेंभुर्णी, करमाळा आदी भागांत जाहीर सभा घेतल्या. त्या वेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाशिव खोत यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. धुळय़ात जाऊन तेथील शेतक-यांना फसविले. त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली. फसवणुकीचे उद्योग केलेली हीच मंडळी आता माढा परिसरात कसले उद्योग करणार, असा बोचरा सवालही पवार यांनी केला.
ते म्हणाले, शेतक-यांच्या हितासाठी राज्यात व देशात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने धोरणे राबविली. शेतक-यांच्या उसाला भावही दिला. प्रसंगी अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना व साखर कारखानदारीला मदतही केली. परंतु आम्ही केलेल्या या कामाचे श्रेय विरोधक घेऊन स्वत: तोरा मिरवीत आहेत. ज्यांचा गुंठाभर ऊस नाही, ते लोक ऊसदरावर बोलतात, आंदोलने करतात आणि साखर कारखानदारी बंद पाडतात. त्यामुळे उसाच्या गाळपाला विलंब होऊन साखर उत्पादनावर व दर्जावर परिणाम होतो. वर पुन्हा अपप्रचार करून शेतक-यांची दिशाभूल केली जाते. यातून शेतक-यांचे कोणतेही हित साधले जाणार नाहीतर नुकसानच होणार आहे. त्यामुळे शेतक-यांना देशोधडीला लावू पाहणाऱ्या प्रवृत्तीला खडय़ासारखे बाजू काढू टाका, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे आदींची भाषणे झाली.