गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले असून या घटनेने महाराष्ट्र दिनी पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

‘गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही’, असा टोला शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.

सबब नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे.

मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला.

Story img Loader