कर्जत नगर परिषदेच्या सुमारे पाच कोटी रुपये खर्चाच्या नवीन कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन करण्याकरिता केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी (९ ऑगस्ट) कर्जतमध्ये आले होते. रायगड जिल्ह्य़ातील सर्वसामान्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न ठरलेल्या पेण अर्बन बँकेच्या प्रश्नामध्ये आपण लक्ष घालू, अशी ग्वाही त्यांच्याकडून मिळेल अशी भाबडी अपेक्षा बाळगलेल्या सर्वाच्या पदरी मात्र घोर निराशाच आली आहे.
वास्तविक पाहता कर्जतचे आ. सुरेश लाड यांनी अलीकडच्या काळात झालेल्या विकासकामांचा आढावा घेत असतानाच या परिसरातील नागरिकांच्या मनातील काही अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या. केवळ कर्जत तालुक्यातीलच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्य़ातील सर्वसामान्य नागरिकांचा शब्दश: जीवनमरणाचा प्रश्न बनलेल्या पेण अर्बन बँकेच्या संदर्भात शरद पवार यांनी सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले होते.
फक्त कर्जत तालुक्यातीलच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्य़ातील अक्षरश: हातावर पोट असलेल्या हजारो गोरगरीब व्यावसायिकांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळालेली आयुष्यभराची सर्व आíथक पुंजी अतिशय विश्वासाने याच पेण अर्बन बँकेमध्ये गुंतविलेली होती. पंचाहत्तर वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या या बँकेवर सर्वसामान्य नागरिकांनी स्वाभाविकच कमालीचा विश्वास ठेवलेला होता, मात्र ही बँक बंद होऊन आता तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आलेला असला, तरीदेखील आपल्या ठेवींची रक्कम, तसेच बचत खात्यात जमा केलेली रक्कम परत मिळण्याबाबत आजतागायत सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची शाश्वती मिळू शकलेली नाही याकडे आमदार सुरेश लाड यांनी आपल्या भाषणातून शरद पवार यांचे लक्ष वेधून घेतले होते.
यासंबंधी ठोस असा मार्ग काढून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवून देण्याकरिता शरद पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्रालयात एका विशेष बठकीचे आयोजन करण्याकरिता प्रयत्न करावेत आणि रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण संबंधितांचे शिष्टमंडळ घेऊन तेथे उपस्थित राहू, अशी विनंती आमदार सुरेश लाड यांनी आपल्या भाषणातून करताच उपस्थित नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त पािठबा व्यक्त केला होता.
विशेष म्हणजे स्वत: शरद पवार यांनीदेखील हा उत्स्फूर्त प्रतिसाद आवर्जून पाहिला होता. त्यामुळे आपल्या भाषणातून ते यासंबंधी काही ठोस स्वरूपाचे आश्वासन देतील अशीच भाबडी अपेक्षा सर्वाच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. प्रत्यक्षात आमदार सुरेश लाड यांनी उपस्थित केलेल्या अन्य सर्वच मुद्दय़ांचा परामर्श शरद पवार यांनी घेतला.
मात्र पेण अर्बन बँकेच्या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालू, असे आश्वासन देणे तर दूरच राहिले, त्याबाबतचा साधा ओझरता उल्लेख करण्याचेदेखील त्यांनी टाळले. पालकमंत्री सुनील तटकरे यांनीदेखील आपल्या भाषणातून यासंबंधीचा कोणताही उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे पेण अर्बन बँकेच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आणि  लोकप्रतिनिधींचे नेमके कोणते धोरण आहे, ही बाब गुलदस्त्यातच राहिली आहे. शरद पवार यांच्याकडून आपली घोर निराशा झाली असल्याची जळजळीत प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आणि विशेषत्वाने महिलांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा