लोकसभा निवडणुकांनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. नुकताच अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मांडण्यात आल्याची टीकाही विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये जागावाटप, संभाव्य उमेदवार यांच्याबाबत एकीकडे चर्चेच्या फेऱ्या होत असताना दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? यावरही तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीकडून या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असायला हवा, असं विधान ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेलं असताना त्यासंदर्भात आता शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊतांनी शुक्रवारी आणि आज सकाळीही पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याविषयी भाष्य केलं आहे. “महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं हा धोका आहे. महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभेतलं मतदान उद्धव ठाकरेंकडे पाहूनही झालं आहे. अर्थात, तिघांची ताकद एकत्र होती. पण बिनचेहऱ्याची आघाडी ही अजिबात चालणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले होते.

“केंद्रात राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाले असते तर किमान २५ ते ३० जागा वाढल्या असत्या. कोणतंही सरकार किंवा कोणतीही संस्था बिनचेहऱ्याची असू नये. आपण कुणासाठी मतदान करतोय हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधींना, मोदींना मतदान केलं. चेहरा कोण, यावर आमच्यात मतभेद नाहीयेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात एकत्र लढणार आहोत. १७५ ते १८० जागा आम्ही जिंकू”, असा दावा आज संजय राऊतांनी केला आहे.

शरद पवार काय म्हणाले?

दरम्यान, एकीकडे ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा केली जात असताना दुसरीकडे शरद पवारांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. “आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा. एखादी व्यक्ती आमचा चेहरा नाही. सामुहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

शरद पवारांची नरेंद्र मोदींना ‘ही’ विनंती; म्हणाले, “यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी…”!

महाविकास आघाडीतले मित्रपक्ष वाढणार?

“आमची काही निवडणुकीवर अजून चर्चा झालेली नाही. आम्ही असं ठरवलंय की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पक्ष असे आम्ही तिघे मिळून निर्णय घेणार आहोत. माझी त्या बैठकीत अशी सूचना असेल की लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट, आप या लोकांनी आम्हाला मदत केली. जरी आघाडीत सध्या आम्ही तिघंच असणार असलो, तरी डाव्या विचारसरणीचे जे घटक आहेत आणि जे मोदींच्या विरोधात आहेत त्यांनाही सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमची चर्चा झाल्यानंतर जागांचं वाटप झालं की सगळे पक्ष त्यांच्या सहकाऱ्यांना-संघटनेला विश्वासात घेऊन निर्णय घेतील”, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे.

अजित पवार गटातले आमदार परत येणार?

दरम्यान, अजित पवार गटातले आमदार परत आल्यास का भूमिका असेल? अशी विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर सूचक विधान केलं. “त्याविषयी जयंत पाटील आणि इतर लोकांना माहिती असेल ते. माझी काही कुणाशी प्रत्यक्ष भेट झालेली नाही. कोण येतं ते बघूयात. प्रस्ताव तरी येऊ द्या. किमान माझ्याकडे तरी प्रस्ताव आलेला नाही”, असं शरद पवार म्हणाले.