लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग: राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज आदिती तटकरे यांच्या अभिनंदनसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे छायाचित्र गायब झाल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट रविवारी शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीत सहभागी झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर इतर नऊ जणांची कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागली. यात रायगडच्या आदिती तटकरे यांचाही समावेश होता. राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर आदिती तटकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी रोहा तालुक्यात ठिकठिकाणी मोठमोठाले बॅनर लावण्यात आले आहेत, मात्र या बॅनरवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे छायाचित्र गायब असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससाठी दैवत असलेले शरद पवार अचानक सर्वांना नकोसे का झाले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Story img Loader