अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. दोन दिवसांपूर्वी या मंत्र्यांना खातेवाटपही झाले आहे. अशातच बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
या भेटीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, शरद पवार यांनी भेटीत काय प्रतिक्रिया दिली, याबाबतही प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली आहे. ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री दिलीप वळसे-पाटील, उपसभापती नरहरी झिरवळ उपस्थित होते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, “शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एका बैठकीसाठी आले आहेत, ही माहिती मिळाल्यावर आम्ही वेळ न मागता आलो. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहण्यासाठी विचार करावा. तसेच, आम्हाला मार्गदर्शन करावे, ही विनंती शरद पवारांना केली आहे.”
“शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शांतपणे आमचे विचार आणि मत ऐकून घेतली. उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन सुरु होते. सर्व मंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात आपल्या विभागाची जबाबदारी विधानसभेत पार पाडतील,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.