नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीने एनडीएच्या सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण केल्याचं आपण पाहिलं. एनडीएने निवडणूक जिंकली असली तरी इंडिया आघाडीने देशभरात २३४ जागा जिंकत त्यांची ताकद दाखवून दिली आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने (इंडिया) महायुतीला (एनडीए) धोबीपछाड दिला आहे. मविआने राज्यातील ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या आहेत. तर महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं. महाराष्ट्रात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने महायुतीला मोठा धक्का दिला. पवारांच्या या पक्षाने १० पैकी आठ जागा जिंकत त्यांची ताकद दाखवली. तसेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या. बारामतीची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जंगजंग पछाडलं होतं. मात्र शरद पवारांसमोर त्यांचा निभाव लागला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीतील विजयावर शरद पवार यांनी नुकतंच भाष्य केलं आहे. शरद पवार हे सध्या त्यांच्या पक्षाच्या जनसंवाद कार्यक्रमादरम्यान राज्यभर फिरत आहेत. आज (१३ जून) त्यांनी बारामतीतल्या शिर्सुफळ या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत संपूर्ण देशाचं लक्ष आपल्या बारामतीकडे लागलं. होतं. लोकांचं लक्ष का लागलं होतं हे मी वेगळं सांगायची गरज नाही, कारण ते तुम्हाला माहिती आहे.

शरद पवार म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारकाळात तुम्ही (जनता) बोलायला तयार नव्हता. वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी, नेते, प्रचाराला येत होते, गावोगावी फिरायचे, त्यांच्या प्रचार सभा आणि कार्यक्रमांना लोक जमायचे, पण कोणी बोलायला तयार नव्हतं. लोक गप्प बसायचे. आमचे पदाधिकारी माझ्याकडे येऊन मला सांगायचे की लोक बोलत नाहीत. मी त्यांना म्हणायचो, तुम्ही काळजी करू नका. लोक आज जरी बोलत नसले तरी मतदानाच्या दिवशी ते योग्य बटन दाबतील. मतदानाच्या दिवशी नेमकं तेच झालं. प्रचारकाळात लोक गप्प बसले. मात्र मतदानाच्या दिवशी ते स्वस्थ बसले नाहीत. कदाचित मतदारांना वाटत असेल की नको त्या गोष्टींमध्ये आपण आत्ता भाग घ्यायला नको. परंतु, मतपेटी काय चमत्कार करू शकते हे इथल्या लोकांनी दाखवून दिलं. मतदानाच्या वेळी इथलं एकही गाव मागे राहिलं नाही. तुम्ही सर्वांनी मतदानाचा विक्रम केला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणाले, संपूर्ण देशाचं बारामतीकडे लक्ष होतच, परंतु जगभरातील अनेकांचं लक्ष बारामतीकडे लागलं होतं. अमेरिकेत न्यूयॉर्क नावाचं शहर आहे. या शहरातला एक भाग आहे, जिथे जगभर काय काय चाललंय त्याचे पोस्टर किंवा बोर्ड लावले जातात. तिथल्या एका बोर्डवर बारामतीच्या निवडणुकीची माहिती होती. म्हणजे बघा बारामती कुठपर्यंत पोहोचली आहे. अगदी न्यूयॉर्कपर्यंत तुम्ही पोहोचला आहात. याचा अर्थ लोकांचं निवडणुकीकडे लक्ष होतं आणि त्याचा परिणाम निकालातून दिसून आला.

हे ही वाचा >> “अजून किती मुस्कटदाबी सहन करणार?” सुषमा अंधारेंचा रुपाली ठोंबरेंना सवाल; म्हणाल्या, “निर्णय घेण्याची…”

मोदींमुळे चर्चा झाली : पवार

शरद पवार म्हणाले, मी आजवर अनेक निवडणुका लढलो आहे. खरंतर मी किती निवडणुका लढलो हे मला आठवतही नाही. सुरुवातीच्या काळात मी मतं मागण्यासाठी तुमच्याकडे आलो. मात्र नंतरच्या काळात मी फक्त कामातून तुमच्या संपर्कात राहिलो. मी मतं मागायला आलो नाही. परंतु, तुम्ही मतदान कधी चुकवलं नाही. तुम्ही तुमचं काम चोख करत आला आहात. अजूनही करत आहात. परंतु, या वेळच्या निवडणुकीत परिस्थिती थोडी वेगळी होती. त्या परिस्थितीही तुम्ही माझ्या अपेक्षेप्रमाणे मतदान केलं. काही लोकांना वाटतं की बारामतीत चमत्कार झाला. परंतु एवढी चर्चा व्हायचं कारण नाही. बारामतीच्या निवडणुकीची चर्चा होण्याचं खरं कारण म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. कारण त्यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं, निवडणुकीत ज्या गोष्टी मांडायच्या नसतात, बोलायच्या नसतात त्या त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवल्या. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींची अधिक चर्चा झाली

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar explain how supriya sule won baramati lok sabha election 2024 asc
Show comments