“दत्तात्रय वळसे पाटील यांनी माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आंबेगाव तालुक्याने दत्तात्रय वळसे पाटील सारखे नेते दिले. त्यांच्या वारसदारांना (दिलीप वळसे पाटील) आम्ही खूप काही दिलं. विधानसभेचं अध्यक्ष केलं, मंत्रिपदं दिलं, देशाच्या साखर उद्योगाचे अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थांवर काम करण्याची संधी दिली. एवढं दिल्यानंतरही दत्तात्रय पाटील यांच्या ठायी जी निष्ठा होती, त्यातील पाच टक्के निष्ठा सुद्धा दिलीप वळसे पाटील यांच्यात नाही”, अशी टीका शरद पवार यांनी आज आंबेगावमधील मंचर येथे घेतलेल्या सभेत केली. दिलीप वळसे पाटील यांच्यावर आरोप करताना पवार म्हटले की, “जर हे लोक आम्हा लोकांबरोबर निष्ठा ठेवत नसतील तर उद्या निवडून दिल्यानंतर जनतेशीही निष्ठा ठेवणार नाहीत, एवढंच मला सांगायचे आहे. हे चित्र बदलायचे असेल तर तुम्हा सर्वांना जागं राहावं लागेल.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमोल कोल्हेंसारख्या नेत्याची निवड करा

“डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा खासदार इथल्या जनतेने निवडून दिला. लोकसभेत ते बोलायला लागल्यानंतर इतर खासदार अतिशय शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून गेतात. कोल्हेंसारख्या निष्ठावान लोकांची आज गरज आहे. सामान्य माणसाला जागं करून जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या नेत्यांची निवड करा”, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

लाव रे ते व्हिडिओ म्हणत निकम यांची टीका

शरद पवार यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी असलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाबरोबर गेल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. आज शरद पवार गटाकडून दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव या मतदारसंघातील मंचर येथे जाहिर सभा घेण्यात आली. या सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. दिलीप वळसे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी आणि आता शरद पवार गटात असलेल्या देवदत्त निकम यांनी दिलीप वळसे पाटील यांची जुनी विधानं मोठ्या पडद्यावर दाखवले.

लोकसभा संपल्यानंतर या नेत्यांना बाजूला करणार

रोहित पवार यांच्यामुळे शरद पवार यांची साथ सोडली, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. त्यामुळे रोहित पवार आज काय बोलतात, याकडेही अनेकांचे लक्ष होते. रोहित पवार म्हणाले की, एकदा लोकसभा निवडणूक आटोपली की या लोकांना भाजपा पक्ष विचारणार नाही. त्यांना विधानसभेला भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. मागच्या काही काळापासून कांदा निर्यातीवर बंदी आणली गेली. पण निर्यातीवरील बंदी उठविण्यासाठी यांनी एकही पत्र लिहिले नाही. फक्त सरकारमध्ये जाऊन बसण्याने तुमचा विकास होत असेल तर पण जनतेच्या विकासाचे काय? असा सवाल उपस्थित करून रोहित पवारांनी जोरदार टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar faction leaders criticize dilip walse patil in ambegaon rally kvg