अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. पक्षात फूट पडल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं समीकरण काय असेल? यावरून चर्चा सुरू आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना बघायला मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बारामतीतून सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा चर्चांवर कुणीही विश्वास ठेवू नये. जोपर्यंत एखाद्या पक्षाकडून उमेदवारी घोषित केली जात नाही, तोपर्यंत यावर चर्चा करून वेळ वाया घालवू नये, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”
बारामती लोकसभा मतदारसंघातील सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संभाव्य लढतीबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “अशा चर्चांवर कुणीही विश्वास ठेवू नये. जेव्हा एखाद्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी घोषित केली जाईल. त्यानंतरच त्या गोष्टीला खरं समजावं. आज यावर चर्चा करून आपल्या सर्वांचा वेळ वाया घालवू नये.”
“शेवटी याबाबत भाजपा आणि त्यांच्याबरोबर गेलेले नेते निर्णय घेतील. पण बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेच उभ्या राहतील. त्यांच्या विरोधात कोण उभं राहतंय? हे आपल्याला येत्या काळात बघावं लागेल,” असंही रोहित पवार म्हणाले.