Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अजित पवार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख या आठवड्यात जाहीर होऊ शकते. त्याआधीच शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी अजित पवार यांची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयाकडे ही विनंती केली आहे की महाराष्ट्रातील निवडणुकीच्या आधी घड्याळ चिन्ह गोठवावं. हे चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला मिळू नये. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र शरद पवारांच्या पक्षाच्या बाजूने निर्णय आला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची निवडणुकीत अडचण होणार आहे यात शंका नाही.

शरद पवारांची सर्वोच्च न्यायालयाला काय विनंती?

शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊ नये. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हे चिन्ह त्यांना मिळू नये त्याऐवजी नवं चिन्हं द्यावं अशी मागणी केली आहे. अजित पवारांच्या पक्षाने नव्या चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा आणि त्यांच्याकडून मिळालेल्या चिन्हावर निवडणूक लढावी अशी मागणीही या अर्जात करण्यात आली आहे. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- “पंतप्रधान मोदींच्या अगाध ज्ञानाचं…”; महात्मा गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून शरद पवारांचा टोला!

जुलै २०२३ मध्ये काय घडलं?

जुलै २०२३ या महिन्यात अजित पवार यांनी ४१ आमदारांना बरोबर घेऊन बंड केलं आणि आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहोत असा दावा केला. त्यामुळे शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे दोन तुकडे पडले. ज्यात शरद पवारांचा ( Sharad Pawar ) राष्ट्रवादी पक्ष विरोधात राहिला तर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत गेला. हा वाद जेव्हा निवडणूक आयोगापुढे गेला होता तेव्हा अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने दिलं होतं. त्यानंतर आता शरद पवार यांनी हे चिन्ह गोठवण्यात यावं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवं चिन्हं द्यावं अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

अजित पवारांची कोंडी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात शरद पवार

शरद पवारांनी ( Sharad Pawar ) निवडणूक आयोगाने घड्याळ हे पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव अजित पवारांना देण्याचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात शरद पवारांच्या बाजूने निर्णय दिला आणि चिन्ह गोठवलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण चांगलीच वाढू शकते. ज्यावेळी चिन्ह आणि पक्ष कुणाचा आहे हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला तेव्हा त्यांनी अजित पवार हेच पक्षाचे सर्वेसर्वा आहेत असा निकाल देत त्यांना घड्याळ हे पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव दिलं. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिलं होतं. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची कोंडी करण्यासाठी शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.