राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आ. संजय राऊत सरकारविरोधात वर्तमानपत्रात लिहीत होते म्हणून त्यांना अटक केलं,” असा आरोप पवारांनी केला. तसेच संजय राऊत यांना करोना काळात औषधांसाठी किती खर्च केला असे प्रश्न विचारले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते मंगळवारी (२३ ऑगस्ट) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “सामनाचे संपादक संजय राऊत खासदार आहेत आणि माझ्यासोबत संसदेत बसतात. मागील तीन-चार आठवड्यांपासून त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं. का अटक केलं? नबाव मलिक जसे सरकारच्या चुकीच्या गोष्टी जनतेसमोर ठेवत होते तसेच संजय राऊत वर्तमानपत्रात लिहीत होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात केस करण्यात आली.”
“करोना काळात जी औषधं घेतली त्यासाठी किती खर्च झाला?”
“आम्ही त्यांच्या कुटुंबाला सांगितलं की जेव्हा जेवण देण्यासाठी जाल तेव्हा काय प्रश्न विचारतात हे विचारा, काय चौकशी सुरू आहे हे विचारा. त्यावर आम्हाला माहिती मिळाली की, त्यांना एवढंच विचारलं जातं की, मुंबई शहरात करोना काळात जी औषधं घेतली त्यासाठी किती खर्च झाला? संजय राऊत म्हणाले, मी संपादक आहे, तेथे किती खर्च झाला हे डॉक्टरला विचारा, रुग्णालयाला विचारा. मला का विचारता?”, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
हेही वाचा : ‘एक महिन्यानंतर शरद पवारांना कंठ फुटला” अतुल भातखळकरांची खोचक टीका, म्हणाले…
“जोपर्यंत ही माहिती देत नाहीत तोपर्यंत तुमची सुटका नाही म्हणत त्यांना तुरुंगात ठेवलं आहे. देशात भाजपाची सत्ता नाही अशा अनेक राज्यांमध्ये आमदार, खासदार, मंत्र्यांवर कारवाई होत आहे,” असाही आरोप पवारांनी केला.