जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. यानंतर संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केल्याचंही समोर आलंय. पोलिसांच्या लाठीचार्जवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते शुक्रवारी (१ सप्टेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार म्हणाले, “मला जालन्यातून एक दोन लोकांचे फोन आले आणि त्यांनी तिथं काय घडलं ते सांगितलं. मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्यांच्याशी विचारविनिमय केला. त्या चर्चेत सगळं शांततेत सुरू होतं. मात्र, चर्चेनंतर पोलीस बळाचा वापर करून त्यांना तिथून हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न केला गेला.”

“लाठीहल्ला करण्याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी”

“यात आंदोलकांवर प्रखर लाठीहल्ला केला. खरं म्हणजे एकदा चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची काहीही गरज नव्हती. मात्र, हल्ली अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कुठलेही प्रश्न असले आणि ते उत्तर न मिळाल्याने रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी,” असा आरोप शरद पवारांनी केला.

“काही घटकांबद्दल गृहमंत्र्यांच्या मनातील भावना पोलिसांच्या कृतीतून दिसली”

शरद पवार पुढे म्हणाले, “राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दलची जी भावना आहे ती पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. हे चित्र जालन्यात दिसलं आहे. यात पोलिसांना काय दोष द्यायचा. पोलिसांना वरच्या पातळीवरून अशा सूचना आल्या आणि त्यांनी कामगिरी केली. यामुळे पोलीस आणि तरुणांमध्ये कारण नसताना कटुता वाढली. याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारला आणि गृहखात्याची जबाबदारी असणाऱ्यांची आहे.”

हेही वाचा : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“…तर मला त्या ठिकाणी जाऊन लोकांना धीर द्यावा लागेल”

“या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. हे थांबवलं नाही, तर मला त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना धीर द्यावा लागेल. तसेच या लोकांची सुटका करण्यासाठी पावलं टाकावी लागतील. पोलिसांनी चर्चा केली आणि त्यानंतर लाठीहल्ला केला. हा अमानुष हल्ला आहे, असं स्थानिकांनी सांगितलं,” असंही पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar first reaction on jalna maratha protest police lathi charge pbs