राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे दोन्हीही अजित पवारांना देण्यात आलं आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र यावर शरद पवार यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता ती प्रतिक्रियाही समोर आली. पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याला दिलं म्हणून अस्तित्व संपत नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. साताऱ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवारांना

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दोन दिवसांपूर्वीच समोर आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर काही महिने याप्रकरणी सुनावणी झाली. नार्वेकर यांनी दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेले पुरावे, दस्तावेज तपासले. तसेच दोन्ही गटांमधील नेत्यांची उलटतपसाणी करून अखेर याप्रकरणाचा निकाल सुनावला आहे. नार्वेकर यांनी शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. तसेच अजित पवार गटातील आमदारांना पात्र ठरवलं आहे.

आमदार अपात्र नाहीत

राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याच्या निर्णयाचा आधार घेत शरद पवार गटाकडून सादर केलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. नार्वेकर निकाल वाचताना म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला विधानसभेच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४१ आमदारांचा पाठिंबा आहे. तर शरद पवार यांच्याबरोबर केवळ १२ आमदार आहेत. शरद पवार गटाने या दाव्याला कुठेही आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे दोन्ही गटांचं संख्याबळ इथे स्पष्ट होत आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. असं म्हटलं होतं. आता या सगळ्या प्रकरणी शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

हे पण वाचा- “…तर मी विधानसभा निवडणूक लढणार नाही”, अजित पवारांचं मोठं वक्तव्य; भावूक होत म्हणाले…

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

पक्षातून लोक सोडून जातात, नवे येतात. या गोष्टी घडत असतात, मात्र असं कधी घडलेलं नाही की ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला. नुसता पक्षच दिला नाही तर चिन्हही देऊन टाकलं. ठीक आहे, हा निर्णय कायद्याला धरुन आहे असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल नीट लागेल अशी अपेक्षा आहे. दुसरं एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो चिन्ह गेलं तरीही त्याची चिंता करायची नसते. मी आत्तापर्यंत १४ निवडणुका लढलो त्यातल्या पाच निवडणुकांमध्ये चिन्हं वेगवेगळी होती. पहिल्यांदा बैलजोडी होती, नंतर गाय-वासरु आलं, त्यानंतर चरखा हे चिन्ह आलं, त्यानंतर हाताचं चिन्ह आलं. त्यानंतर घड्याळ आलं. वेगळी चिन्हं आपण पाहिली आहेत. त्यामुळे कुणाला असं वाटत असेल की चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेचं अस्तित्व संपेल तर असं घडत नसतं. सामान्य माणसांशी संपर्क वाढवला पाहिजे. त्यांना नवं चिन्ह काय आहे ते पोहचवलं पाहिजे इतकंच महत्त्वाचं असतं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Story img Loader