Sharad pawar in Jalgaon: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. ओबीसींच्या कोट्यातून आणखी एक वाटेकरी देणं हा ओबीसी गरीब समाजावर अन्याय होईल असं काहींचं म्हणणं आहे आणि ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. अशात मग मराठा आरक्षण जर द्यायचं असेल तर काय करता येईल तो पर्यायही शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितला.
काय म्हणाले शरद पवार?
मराठा आरक्षण द्यायचं असेल तर आज जी ५० टक्क्यांची अट आहे त्यात १५ ते १६ टक्क्यांची भर घालावी. या संदर्भातली दुरुस्ती केंद्र सरकारने संसदेत केली तर हा प्रश्न सुटेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. आज ते जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि एक प्रकारे हा मार्गच सांगितला.
जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. तसंच मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून उपोषणालाही बसले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा विषय राज्यात पुन्हा चर्चेत आहे. याबाबत आता शरद पवार यांनी ही भूमिका माडली आहे.
इंडिया नाव हटवलं जाणार?
जळगावत शरद पवार यांची सभा पार पडत आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘इंडिया’ हा शब्द संविधानातून हटवणार असल्याबद्दल शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, “आमच्याकडं तशी माहिती नाही.”
“मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांच्या प्रमुखांची बुधवारी बैठक बोलावली आहे. त्याबैठकीत याप्रकरणाचा विचार होईल. पण, हे नाव हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोणीही नाव हटवू शकत नाही. सत्ताधारी लोकांना देशाशी निगडीत असलेल्या नावाची एवढी अस्वस्थता का वाटत आहे, हे मला समजत नाही,” असा टोला शरद पवारांनी मोदी सरकारला लगावला.