गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर धगधगतंय. भारताच्या इशान्येकडील या राज्यात अडीच महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. तिथे झालेल्या धार्मिक स्थळांवरील हल्ल्यांमुळे नागरिक दुखावले गेले आहेत. अशातच बुधवारी मणिपूरमध्ये आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. परंतु, दोन महिने उलटले तरी अद्याप या गुन्ह्यातील आरोपींना अटक झालेली नाही. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगितलं.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. पवार यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे, ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, मणिपूरमधील विदारक दृश्य पाहून मन दुखावलं आहे. विशेषत: महिलांवरील अत्याचाराचं विदारक दृश्य घृणास्पद आहे. त्यामुळे हीच वेळ आहे संघटित होण्याची, आपला आवाज उठवण्याची आणि मणिपूरच्या लोकांसाठी न्याय मागण्याची. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयासह गृह विभागाने तातडीने आवश्यक कारवाई करणे आवश्यक आहे.
या ट्वीटसह शरद पवार यांनी भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य लिहिलं आहे. “माणुसकीशिवाय तुझा गौरव व्यर्थ आहे,” हे बाबासाहेबांचं वाक्य शरद पवार यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
हे ही वाचा >> पायाखाली पक्का रस्ता नाही, वरून पावसाला खंड नाही… रायगड दरड दुर्घटनेत बचाव पथकांसमोर आव्हानांचा ‘डोंगर’!
मणिपूरमधील या संतापजनक घटनेबद्दल माहिती देताना पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी निवेदन जारी केलं. मेघचंद्र यांनी म्हटलं आहे की, “दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य पोलीस दल आरोपींचा शोध घेत आहे. आरोपींना अटक करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत.