लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस राहिले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांच्याबाबत पुन्हा एक मोठा दावा केला. “अजित पवार आणि सहकाऱ्यांनी २ जुलै रोजी शपथ घेतल्यानंतर काही दिवसांनी शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, असा दावा प्रफुल पटेल यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पटेल यांच्या दाव्याला दुजोरा मिळेल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनी या दाव्यावर प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना प्रफुल पटेल यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शरद पवार म्हणाले की, त्यांनी जे विधान केले, त्यानंतर आजपर्यंत काय वस्तुस्थिती दिसते. मी भाजपाबरोबर जायला पाठिंबा दिला, असे ते म्हणाले. पण भाजपामध्ये कुणी गेले का? तर अजिबात नाही.
याशिवाय १९९६ साली एचडी देवेगौडा हे शरद पवारांना पंतप्रधान बनविण्यासाठी तयार होते. मात्र शरद पवारांनी ऐनवेळी कच खाल्ली आणि त्यानंतर आता भाजपाबरोबर जाण्याच्या निर्णयावरही त्यांनी माघार घेतली, अशी टीका प्रफुल पटेल यांनी केली होती. त्याबाबत उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, १९९६ सालची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी मला तेव्हा योग्य वाटले नाही, म्हणून मी देवेगौडा यांच्यासोबत गेलो नाही, असे शरद पवार म्हणाले.
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले होते?
“जेव्हा राजकारणाचा प्रश्न येतो, तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. २ जुलै रोजी अजित पवार आणि आमच्या काही नेत्यांनी या सरकामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर १५ आणि १६ जुलै अशा दोन वेळा आम्ही मुंबईत शरद पवार यांना भेटलो, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केली. साहेब जे झाले ते झाले. तुम्ही आमच्या निर्णयाबरोबर येण्याचे पसंत केले नाही. पण आमची तुम्हाला विंनती आहे की, तुम्ही आमच्याबरोबर या. कारण आम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. त्यामुळे प्रयत्न करण्याच्याबाबतीत आम्ही काही कमी केली नाही. त्यानंतर पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यामुळे यामधून असे संकेत दिसत होते की, आमची आणि त्यांची चर्चा सुरु होती आणि ते (शरद पवार) ५० टक्के तयार होते”, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
प्रफुल्ल पटेलांच्या विधानावर फडणवीस काय म्हणाले?
प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “मी आता या निवडणुकीत त्यावर काही बोलणार नाही. आधीदेखील या विषयासंदर्भात मी बोललो आहे. पण हे सत्य आहे.”