निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी पक्ष तसेच घड्याळ हे पक्षचिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले आहे. त्यामुळे स्वत:च स्थापन केलेला पक्ष आता शरद पवार यांच्या हातातून गेला आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीवर निवडणूक आयोगाच्या या निकालाचा परिणाम होऊ नये म्हणून शरद पवार वेगवेगळ्या सभांना संबोधित करत आहेत. मुंबईत ‘ज्योत निष्ठेची, सावित्रीच्या लेकींची’ या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी स्त्री-पुरुष समानता आणि नारीशक्तीवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी संरक्षणमंत्री असताना घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाचाही उल्लेख केला.
“२५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची स्थापना केली”
“मला आठवतं की २५ वर्षांपूर्वी याच सभागृहात राष्ट्रवादीची निर्मिती करण्याचा ठराव आम्ही केला होता. पक्षाची स्थापना केली आणि संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्कवर सभा झाली. या सभेला महाराष्ट्रातून १ लाखाच्या वर कार्यकर्ते आले होते. हा असा पक्ष आहे ज्याची स्थापना झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर सत्तेची जबाबदारी सोपवली होती. आपण एक विचारधारा स्वीकारली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वांचा आदर्श आपल्यासमोर आहे,” असे शरद पवार राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
सावित्रा बाई फुले, महात्मा फुलेंचा उल्लेख
“महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अशिक्षित वर्गाला सन्मानाने जगण्यासाठी शिक्षित करण्याचे काम केले. सावित्रीबाईंनी पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींची शाळा काढली. विरोध होत असतानाही त्याची चिंता न करता स्त्री शिक्षणाचा पाया रचला. तर महात्मा ज्योतीराव फुले यांनी आधुनिकता, विज्ञान याचं महत्त्वं आणि समाजातील गरिबी घालवण्यासाठी जी धोरणं राबवण्याची आवश्यकता आहे त्याचा आग्रह इंग्रज सरकारकडे केला होता,” असे शरद पवार यांनी सांगितले.
सांगितला महात्मा फुलेंचा ‘तो’ किस्सा
“या देशावर इंग्रजांचे राज्य होते. हे राज्यकर्ते जेव्हा भारतात यायला निघाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एक कमान बांधली. त्याला आपण गेट वे ऑफ इंडिया असे म्हणतो. त्या गेट वे ऑफ इंडियाजवळ इंग्रज राजाची बोट उतरली. तिथे एका कोपऱ्यात एक फेटा बांधलेला आणि हातात कागद असलेला एक ग्रामीण भागातील ग्रहस्थ उभा होता. राजा बोटीतून उतरला आणि गाडीत बसायला जात असताना त्यांच्या लक्षात आले की हा कोण आहे. हा का उभा आहे. राजाने अधिक चौकशी केली. या राजाला सांगण्यात आले की या माणसाला एक निवेदन द्यायचे आहे. हे निवेदन राजाने स्वीकारले. त्या निवेदनात तीन ते चार मागण्या होत्या. एक मुलींचे शिक्षण, दुसरे शेती सुधारायची असेल तर पावसाचे पाणी आडवाण्याची, तिसरी मागणी ही शेतकऱ्यांच्या जोडधंद्यासाठी चांगल्या जातीच्या गायींची मागणी केली होती. हे ग्रहस्थ महात्मा फुले होते,” असे शरद पवार यांनी सांगितले.
“लष्करात महिला का नाहीत, असे विचारले, पण…”
“मी देशाचा संरक्षणमंत्री होतो. मी जगामध्ये पाहिलं की अनेक देशांत लष्करामध्ये महिला महत्त्वाचं काम करत होत्या. मी आपल्या देशाचे हवाईदल, नौदल आणि लष्कराचे प्रमुख या तिघांनाही बोलावलं होतं. त्यांना विचारलं की आपल्या लष्करात महिला का नाहीत. तर त्यांनी मला हे अजिबात शक्य नाही असं सांगितलं. या देशाचं रक्षण करण्याची ताकद महिलांत नाही असं मला त्यांनी सांगितलं,” असे शरद पवार यांनी सांगितले.
“…अन् लष्करात ११ टक्के जागा महिलांना देण्याचा निर्णय घेतला”
“त्यानंतर एक वर्ष गेलं, दोन वर्षे गेली, तीन वर्षं गेली मात्र तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांनी मला हेच उत्तर दिलं. मात्र चौथ्या वर्षी मी सांगितलं या देशातल्या जनतेनं संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे. माझा हा निर्णय आहे की पुढच्या महिन्यापासून देशाच्या लष्करात सुरुवातीला ११ टक्के जागा मुलींना देण्यात येतील. मी हा निर्णय घेतला होता. आज आपण बघतोय की २६ जानेवारीच्या परेडचं नेतृत्व आज महिला करत आहेत. सीमेवरच्या महत्त्वाच्या भागाचे नेतृत्व महिला करत आहेत. नौसेनेत महिला काम करत आहेत. वैमानिक म्हणूनही महिला काम करत आहेत,” अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.