Vidya Chavan On Ajit Pawar : विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर आल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणुकीसाठी सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. राज्यभरात नेत्यांचे दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यावेळी सभा, मेळावे, आढावा बैठका घेतल्या जात आहेत. तसेच विविध मतदारसंघाचा आढावा आणि उमेदवारांची चाचपणी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

यातच बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर टीकेची झोड उठवली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा वचक राहिला नसल्याची टीका करण्यात आली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी मोठी मागणी केली आहे. “देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद सांभाळता येत नाही. त्यामुळे अजित पवारांकडे गृहखातं द्यावं”, असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंचा दावा खोटा? दोन महिन्यापूर्वी फाशी दिल्याचे प्रकरण २ वर्षांपूर्वीचे; नेमके सत्य काय?

विद्या चव्हाण काय म्हणाल्या?

“देवेंद्र फडणवीसांनी सात वर्ष गृहमंत्रीपद सांभाळलं. मात्र, सर्वात अपयशी गृहमंत्री ते आहेत. त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी काहीही केलेलं नाही. लहान मुलांपर्यंत आता अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, राज्याचं गृहखातं आता अजित पवारांकडे द्यावं. कारण अजित पवार हे कडक स्वभावाचे आहेत. ते पोलिसांमध्ये एक दरारा निर्माण करू शकतील आणि चांगलं काम करतील. त्यामुळे शेवटचे दोन महिने हे गृहमंत्रीपद अजित पवारांकडे द्यावं”, असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.

“देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीच्या कामांमध्ये जास्त व्यस्त आहेत. त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त तिकीट कसे मिळतील? यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. राज्यात एवढ्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र, पोलीस दल देवेंद्र फडणवीस यांना सांभाळता येत नाही. त्यामुळे एक तर गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे घ्यावं किंवा अजित पवारांकडे द्यावं”, असंही विद्या चव्हाण यांनी म्हणाल्या आहेत.