Jitendra Awhad On Ajit Pawar : विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मागील काही दिवसांपासून विविध मतदारसंघात नेत्यांचे दौरे सुरु आहेत. या दौऱ्यावेळी ठिकठिकाणी सभा आणि मेळावे सुरु आहेत. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गुलाबी रंगांतून कॅम्पेनिंग सुरू केले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसिद्धीची रणनीती आखत गुलाबी रंग ही पक्षाची खास ओळख तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

पक्षाच्या सभा आणि कार्यक्रमामध्ये सर्वत्र गुलाबी रंग प्राधान्याने वापरण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे स्वत: अजित पवार हे देखील गुलाबी रंगाचे जॅकेट वापरत असल्याचं पाहायला मिळतं. अजित पवारांच्या या गुलाबी राजकारणावरून विरोधकांकडून टीकाही करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर यावरूनच हल्लाबोल केला आहे. “पांढरे कपडे सोडून गुलाबी झालेल्या अजित पवारांच्या सभेला लोक सुद्धा येत नाहीत”, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर (ट्विटर) एक व्हिडीओ शेअर करत केली आहे.

हेही वाचा : “मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे असे..”, अमृता फडणवीस यांची शरद पवारांवर टीका, उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाल्या?

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“पैसे देऊन वोट घेणे, पैसे देऊन लोकं जमा करणे, ही या सत्ताधाऱ्यांची आता सवय झाली आहे. एकंदरीतच या कारभारामुळे लोकं इतकी वैतागलेली आहेत की ते कशालाच साथ देत नाहीत. आता बघा ना, पांढरे कपडे सोडून गुलाबी झालेले अजित पवार यांच्या सभेला सुद्धा लोक येत नाहीत. मग, लोकांना आणण्यासाठी भ्रष्टाचारातून आलेला पैसा वापरलाच पाहिजे, म्हणूनच सभेमध्ये खुलेआम पैसे वाटताना लोकं दिसत आहेत. आता तरी ओळखा, जनतेला तुम्ही केलेली गद्दारी आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिटकारा आलाय, म्हणूनच पैसे देऊन सुद्धा लोकं जमत नाहीत”, असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीका केली आहे.

सभेला पैसे देऊन लोक जमा केल्याचा आव्हाडांचा आरोप

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका करत सभेतील एक व्हिडीओ ट्विट केला असून सभेला पैसे देऊन लोक जमा केल्याचा आरोप केला आहे. “पैसे देऊन वोट घेणे, पैसे देऊन लोकं जमा करणे, ही या सत्ताधाऱ्यांची आता सवय झाली आहे. या कारभारामुळे लोकं वैतागलेली असून ते कशालाच साथ देत नाहीत”, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.