Jitendra Awhad Shivneri Bus : मुंबई-पुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेप्रमाणे आता ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा आमदार भरत गोगावले यांनी जाहीर केला आहे. तसेच प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा आणि गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, असा आमचा प्रयत्न असल्याचं एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी सांगितलं. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ई-शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्याच्या निर्णयावर खोचक टीका केली आहे. “विमानाची आणि बसची तुलना करणं म्हणजे भरत गोगावलेंचे पाय धरून नमस्कार केला पाहिजे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“शिवनेरी बसमधील या महिलांना (शिवनेरी सुंदरी) छत्री द्यावी लागेल. कारण बसमध्ये पावसाचं पाणी गळतं. खरं म्हणजे विमानाची आणि बसची तुलना करणं म्हणजे भरत गोगावलेंचे पाय धरून नमस्कार केला पाहिजे. आपण पाहिलं तर एसटी महामंडळाकडे चार चांगल्या बस नाहीत. किमान चांगले ड्रायव्हर ठेवू, कंडक्टर ठेवू असं काहीतरी म्हणा. आता ‘शिवनेरी सुंदरी’ना काय काम देणार हे त्यांनी सांगावं?”, असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी भरत गोगावले यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

हेही वाचा : Shivneri : विमानातील हवाई सुंदरी प्रमाणे आता शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’, भरत गोगावलेंची घोषणा

बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ सुरू करण्यात येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. तसेच अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांसह आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित संस्थांना बस स्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.सेमी.ची जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०४ वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चाही झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar group ncp mla jitendra awhad shivneri sundari st bus decision shivsena mla bharatshet gogawale gkt