महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला त्यांची ३०० जागाही एनडीएसह जात जिंकता आलेल्या नाहीत. महाराष्ट्रात भाजपाचं अक्षरशः पानिपत झालं आहे. कारण २०१९ ला २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला यावेळी अवघ्या ९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. अशात बारामतीची हाय व्होल्टेज निवडणूकही महायुतीला जिंकता आलेली नाही. त्यानंतर आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. आज शिवराज्याभिषेक दिन आहे त्या निमित्ताने रोहित पवारांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
काय आहे रोहित पवारांची पोस्ट?
मान झुकवायचीच असेल तर दिल्लीऐवजी इथं रायगडावर झुकवा!
३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं आणि स्वराज्याच्या या छत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक झालो. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशभरातून आलेले असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांनी दिलेले विचार जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि आपली पिढी हे विचार जपतील, जगतील आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवतील, असा विश्वास आहे. सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या लाख लाख शुभेच्छा!
राज्यात मविआला मिळालेला विराट वाजय हा संघर्षाचा विजय आहे
राज्यात मविआला मिळालेला विराट विजय हा आदरणीय शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी न डगमगता उघडपणे केलेल्या संघर्षाचा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे.
धाडस दाखवून प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला सत्याची जोड असेल तर यशाला कुणीही रोखू शकत नाही. पण अशा परिस्थितीत आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना? याचाही शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ नये, म्हणजे झालं! अशीही पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.
लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रात ४० हून जास्त जागा निवडून येतील असा आत्मविश्वास महायुतीने व्यक्त केला होता. तर दुसरीकडे आमच्या ३० ते ३५ जागा येतील अदा दावा महाविकास आघाडीने केला होता. महाविका आघाडीचा दावा खरा ठरल्याचं निवडणूक निकालांनी दाखवून दिलं. महाराष्ट्रात महायुतीला १७ च जागा जिंकता आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी यानंतर राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली आहे. अशात रोहित पवारांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आहे. तसंच दिल्लीपुढे झुकण्यापेक्षा रायगडाव येऊन शिवरायांच्या पुढे झुका असाही सल्ला त्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिला आहे.