Bajrang Sonwane: गेल्या काही महिन्यांपासून सर्वांचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अखेर आज (१४ ऑक्टोबर) जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची घोषणा केली. आता महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल लागणार आहे. दरम्यान, विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.
यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालं आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतही मनोज जरांगे फॅक्टर चालणार आणि मराठवाड्यात याचा इम्पॅक्ट पाहायला मिळणार आहे, असं विधान बजरंग सोनवणे यांनी केलं.
बजरंग सोनवणे काय म्हणाले?
“बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी करा, असं पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितलं आहे. सध्या शरद पवार यांच्याकडे येण्याचा अनेकांचं कल आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि शरद पवार हे ठरवतील कोणाला बरोबर घ्यायचं आणि कोणाला बरोबर घ्यायचं नाही. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे जरांगे पाटील याचा इम्पॅक्ट मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे. बीड जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा असा वाद नाही. तो वाद निर्माण केला गेला. मला सर्व लोकांनी मतदान केलं. बीडमधील ज्यांना वाटतं की आपली ताकद कमी आहे, म्हणून जात हा फॅक्टर आणला जात आहे. पण असं काही नाही”, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं.
पंकजा मुंडेंवर खोचक टीका
“गेल्या दोन पिढ्या झालं, त्या फक्त कोयता घासायला लावत आहेत. मात्र, कधीतरी ऊस लावायला सांगायला पाहिजे. बीडमधील जनतेला कधीतरी ऊस लावायला सांगा. की फक्त कोयता घासायला लावता आणि त्यावर राजकारण करता. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तु्म्ही जर खरंच विकास केला असता जिल्ह्यात पाणी आणलं असतं तर ऊस लावला असता. गेले दहा वर्ष केंद्रात तुमची सत्ता आहे मग तुम्ही काय केलं?”, असा हल्लाबोल बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला.
धनंजय मुंडेंवरही टीका
यावेळी बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली. बजरंग सोनवणे म्हणाले, “धनंजय मुंडे म्हणाले होते की, बीडमधून सहाच्या सहा आमदार महायुतीचे निवडून येतील. पण ते चुकून महायुतीचे सहा आमदार निवडून येतील असं म्हणाले असतील. खरं तर महाविकास आघाडीचे सहा आमदार निवडून येतील, असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी खोचक टीका केली.