Tanaji Sawant vs Ajit Pawar: मंत्रिमंडळ बैठकीत नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बाजूला बसावे लागते. पण बाहेर आल्यानंतर मला उलट्या होतात, असे विधान राज्याचे आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी केले. त्यानंतर महायुतीमध्ये उघड वाद पेटला आहे. अजित पवार गटाकडून आता तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले आहे. अन्यथा महायुती आणि सत्तेतून बाहेर पडू, असा इशाराही राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला. यावर आता शरद पवार गटाने खोचक टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेस तपासे यांनी अजित पवार गटाला लक्ष्य केले आहे. “अजित पवारांसारखा एक नेता अशा प्रकारचा अपमान कसे काय सहन करू शकतो, हेच कळत नाही. सत्तेसाठी एवढी लालसा अजित पवारांच्या मनात असेल, हे कधी वाटले नव्हते. त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला? याचा शोध त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे, असा टोला महेश तपासे यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाची पीछेहाट झाली. यासाठी अजित पवार सर्वस्वी जबाबदार आहेत, असा सूर आरएसएस आणि भाजपामध्ये उमटला. राज्यातील पराभवासाठी अजित पवारांना जबाबदार ठरविले. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची अजित पवार यांच्याविषयीची भूमिका आणि नाराजी सर्वांसमोर आली आहे. अजित पवारांच्या अस्तित्वावरच मंत्री तानाजी सावंत यांनी घाला घातला आहे. तरीही अजित पवार गट शांत का?, असाही सवाल महेश तपासे यांनी उपस्थित केला.
म्हणून अपमान सहन करावा लागत असेल
विधानसभेमध्ये महायुतीकडून ८० ते ९० जागा मिळवू, अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली होती. आता २५ जागा मिळतील की नाही, याचीही शाश्वती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राहिली नाही. म्हणूनच त्यांना अशा प्रकारचा अपमान सहन करावा लागत आहे, अशी टीका महेश तपासे यांनी केली.
इकडे असताना वाघ, तिकडे गेल्यावर
शरदचंद्र पवार यांच्या पक्षांमध्ये असताना अजित पवारांच्या बाजूला बसण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ असायची. त्याच अजित पवारांच्या बाजूला बसून शिंदे सरकारच्या मंत्र्यांना उलट्या होतात. खरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या मनातलेच तानाजी सावंत यांनी ओठावर आणले आहे. अजित पवार हे पूर्वी वाघ होते, मात्र आता ते शांत बसले आहेत. त्यांचा हा स्वभाव आमच्यासाठी नवीन आहे, अशीही टीका महेश तपासे यांनी केली.
तानाजी सावंत काय म्हणाले होते?
धाराशिव येथे एका कार्यक्रमात बोलत असताना तानाजी सावंत म्हणाले की, मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही. शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही, असे विधान तानाजी सावंत यांनी केले होते.
![NCP spokesperson Umesh Patil said it is better to leave the mahayuti after tanaji sawants statement on ajit pawar](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/08/hqdefault_930a00.jpg?w=480)
तर महायुतीमधून बाहेर पडू
तानाजी सावंत यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. “तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडू, आपल्याला सत्तेची गरज नाही. तानाजी सावंत यांचा आम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे? एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्री केले त्यामुळे तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळाले. त्याच भाजपाच्या नेत्यांनी अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतले. हा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाने घेतला होता. महायुतीमुळेच तानाजी सावंत मंत्री आहेत. हे त्यांनी विसरू नये. या पद्धतीने जर राष्ट्रवादीला कोण बोलणार असेल तर आम्ही सत्तेत राहणार नाही”, असा इशारा प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला.