जुलै महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार गट सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षातला एक मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. २ जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नुकतीच राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची पालकमंत्रीपदीही वर्णी लागली आहे. तर दुसरीकडे पक्षातील आमदार अपात्रता व पक्षचिन्हाचा वाद यावर अनुक्रमे सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगासमोर सुनावणीही चालू आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सरकारमधील १०० दिवसांच्या पूर्ततेनिमित्त महाराष्ट्रातील जनतेला खुलं पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी शरद पवारांचा उल्लेख न करता यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला. आता शरद पवार गटाने अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत X खात्यावरून अजित पवारांवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…”, अजित पवारांचं महाराष्ट्राला खुलं पत्र!

१०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण असं म्हणत गेल्या १०० दिवसांत सरकारकडून झालेल्या कृतींची दखल घेण्यात आली आहे. “१०० दिवस छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे, १०० दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणण्याचे, १०० दिवस वारकऱ्यांवर, मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या नतद्रष्ट्यांसोबतचे, १०० दिवस रुग्णालयांतील मृत्यूकांडास जबाबदार असंवेदनशील सरकारसोबतचे, १०० दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार, प्रकल्प हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्र विरोधकांसोबतचे, १००दिवस माताभगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राज्यकारभार करण्याचे, १०० दिवस मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत, समाजाचे आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षणाविरोधकांसोबतचे, १०० दिवस मराठी अस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांसोबतचे”, अशी टीका राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली आहे.

“१०० दिवसांचं कर्तुत्व सांगावं लागणं यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येत आहे”, अशी टीकाही त्यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

“पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही. जो तुम्ही गेले १०० दिवस गहाण ठेवलात. कितीही मोठं संकट आलं तरी विचारांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकता महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमध्येच आहे”, असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अजित पवारांच्या पत्रात काय?

अजित पवार यांनी पत्रामध्ये आपल्या निर्णयाच्या १०० दिवसांच्या पूर्तीचा उल्लेख केला आहे. “आज १० ऑक्टोबर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मी पत्राद्वारे आपल्याशी संवाद साधत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात याआधीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली. असे निर्णय त्या त्या वेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीनुसार नेत्यांना घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील झाला”, असं या पत्रात नमूद केलं आहे.

अजित पवारांच्या पत्रावर शरद पवार गटाने टीका केली असल्याने आता अजित पवार गटाकडून काय प्रत्युत्तर येतंय हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar group targeted to ajit pawar letter on 100 days complete in government sgk