अजय महाराज बारसकर यांच्या पाठोपाठ आणखी एका मराठा आंदोलक महिलेने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला वेड्यात काढलं. दंगल का घडली? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे असाही दावा संगीता वानखेडेंनी केला. संगीता वानखेडे या मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलनात कार्यरत होत्या. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर फारकत घेतल्यानंतर संगीता वानखेडेंनी त्यांच्यावर टीका केली आहे आणि आरोप केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाल्या संगीता वानखेडे?

“महाराष्ट्राला मनोज जरांगेंनी वेड्यात काढलं आहे. त्यांचं सुरुवातीपासून चुकतच आलं आहे. सरकारने दंगल घडली की घडवली त्याचा शोध घेतला पाहिजे. पोलिसांनी जो लाठीचार्ज झाला तेव्हा महाराष्ट्राचा उद्रेक दिसला. मनोज जरांगे पाटील कोण हे आधी मीडियाला माहीत नव्हतं. लाठीचार्ज झाल्यानंतर त्यांना डोक्यावर घेतलं. डॉ. प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे त्यांना भेटले. त्यानंतर मनोज जरांगेंना लोकांनी डोक्यावर घेतलं. त्यामुळेच मी त्यांच्याशी जोडले होते. मनोज जरांगे साधासुधा माणूस, आपल्या भाषेत बोलणारा माणूस म्हणून महाराष्ट्राने आणि मी विश्वास ठेवला होता. मी एक महिन्यापूर्वी पर्यंत त्यांच्यासह होते. पण आता मी त्यांच्यासह नाही.”

मनोज जरांगेंवर संशय होताच

“नामदेवराव जाधव यांच्यावर शाईफेक झाली तेव्हाही मनोज जरांगे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मंगेश साबळे कोण हे माहीत नाही असं सांगितलं. मी या मनोज जरांगेची बाजू घेऊन भुजबळांना ट्रोल केलं. मात्र माझ्याविषयी गलिच्छ भाषा वापरण्यात आली. मी तळतळीने बोलत होते. त्यावेळी मला फोन आले, फेसबुकवर फोन आले. संगीता वानखेडेला एकटी समजू नका इतकंच बोलायचं होतं. मात्र या बाबाचं वक्तव्य होतं की मी त्या बाईला बोलायला सांगितलं नव्हतं. मला ती बाब खटकली, मला तेव्हा खूप मनस्ताप झाला. मी रेकॉर्डिंग ऐकलं आहे त्यामुळे मी हे बोलते आहे. मनोज जरांगेंची गडबड आहे हे मलाही कळत होतं. त्यामुळे मी साथ सोडली. मागच्या दीड महिन्यापासून त्यांचा विरोध करते आहे. मी सोशल मीडियावर आहे. मला उदयनराजेंच्या सहकारी फोन करत आहेत. छत्रपतींची गादी माझ्या पाठिशी आहे. मात्र हा माणूस सहानुभूती म्हणूनही काही बोलत नाही.” असंही संगीता वानखेडे म्हणाल्या.

हे पण वाचा- “..तर जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”, छगन भुजबळ यांची पोलिसांकडे मागणी

माझा आवाज कुणीही बंद करु शकत नाही

बारसकर महाराज यांनी जे सांगितलं तेच बरोबर आहे. मनोज जरांगे पाटील कुणालाच विश्वासात घेत नव्हते. एक फोन यायाचा आणि ते पुढची दिशा सांगायचे. तो फोन शरद पवारांचाच असणार दुसरं कोण असणार? शरद पवार त्यांच्यामागे आहेत. आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केला आहे. कालांतराने हे सत्य बाहेर येईल असंही संगीता वानखेडे यांनी म्हटलं आहे. माझं तोंड कुणी बंद करु शकणार नाही. बारसकर यांच्याकडे पुरावा आहे. जरांगे काल काय म्हणाले? हे तर एक-दोनच आहेत. अजून बाहेर येतील असं म्हणाले होते. लोक आता बाहेर येतील. यांची मतं पटलेली नाही आणि लोक फुटलेत. त्यामुळे लोक बाहेर येणार आहेत असंही वानखेडे म्हणाल्या.

हे पण वाचा- ‘मनोज जरांगे तुझे १०० अपराध भरले’, किर्तनकार अजय बारसकर यांचे गंभीर आरोप

मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार

मनोज जरांगेंनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला नीट उत्तर दिलं नाही. शरद पवार जेव्हा भेटायला गेले तेव्हा यांची भाषा बदलली होती. त्यावेळी मला वाटलं होतं मराठ्यांना आरक्षण मिळतंय ना? चांगलं होतं आहे. म्हणून मी साथ दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले की हा लगेच गुन्हे मागे घेण्याची मागणी करतो असाही आरोप संगीता वानखेडे यांनी केला. जे शरद पवारांना हवंय तेच या माणसाला पाहिजे आहे. या सगळ्यामागे शरद पवार आहेत. कारण शरद पवारांचा पक्ष संपला आहे. त्यामुळे राडा, गोंधळ आणि राडा घातला जातो आहे. शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच मनोज जरांगे वागतो असाही आरोप संगीता वानखेडेंनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar hand behind manoj jarange protest said maratha protester sangeeta wankhede scj