राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणाऱ्या एकेठिकाणी गर्दीतून वाट काढणाऱ्या महिलेला बाजुला सरकवल्याने आव्हाडांवर विनयभंगाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी भाष्य केलं आहे. ठाण्याच्या राजकारणात आता मैत्री उरली नाही, येथे स्पर्धा निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली.
यावेळी त्यांनी शरद पवार आणि आनंद दिघे यांच्यातील राजकीय मैत्रीचा एक किस्सा सांगितला आहे. आनंद दिघे यांच्यावर जेव्हा ‘टाडा’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी आनंद दिघेंना जामीन मिळवून देण्यासाठी शरद पवारांनी मदत केली. पवारांनी मदत केली नसती, तर आनंद दिघे कधीच ‘टाडा’च्या बाहेर आले नसते, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि ठाण्यातील सध्याचं राजकारण यावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ठाण्याच्या राजकारणात स्त्रियांना वापरण्याचा कार्यक्रम पहिल्यांदा पार पडला. ठाण्यात असं कधीही झालं नव्हतं. याउलट आनंद दिघेंना जामीन मिळवून देण्यासाठी शरद पवारांनी मदत केली होती, हा ठाण्याचा इतिहास आहे. शरद पवारांनी ठरवलं असतं तर आनंद दिघे ‘टाडा’च्या बाहेर आले नसते. ज्यांनी आनंद दिघेंना बघितलंय आहे, त्यांना हे बरोबर माहीत आहे.”
“त्याचबरोबर आनंद दिघेंची जेव्हा सुरक्षा व्यवस्था काढली होती, तेव्हा पद्मसिंह पाटील गृहमंत्री होते. त्यावेळी आनंद दिघेंनी पद्मसिंह पाटलांना भेटले. माझी सुरक्षा काढू नका, अशी विनंती आनंद दिघेंनी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद दिघेंना जशी होती तशीच सुरक्षा व्यवस्था परत देण्यात आली. याच्यासाठी फार मोठं मन आणि मोठा अनुभव लागतो” असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.