Sharad Pawar on Ramraje Naik Nimbalkar: इंदापूरमध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटा प्रवेश केला. यावेळी शरद पवारांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेवर निवडून पाठवण्याचं आवाहन उपस्थितांना केल्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीवरच अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केलं. पण त्याचवेळी शरद पवारांनी फलटणमधील कार्यक्रमाबाबत केलेल्या सूचक विधानामुळे आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. खुद्द रामराजे नाईक निंबाळकर यांनी पक्षांतराची चर्चा फेटाळून लावली असली, तरी ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्यावर स्तुतिसुमनं
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. त्याचवेळी त्यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणाही केली. “तुम्हा सगळ्यांच्या मनात काही गोष्टींबाबत स्पष्टता आहे की नाही हे मला काही कळलेलं नाही. काहीही काम द्यावं, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. काहीही काम करायचं असतं, तर त्यासाठी तुमची काय गरज आहे? कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल तर अशी कामं हर्षवर्धनकडे द्यायची. ती द्यायची असेल, तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा”, असं शरद पवार उपस्थित लोकांना उद्देशून म्हणाले.
फलटणच्या कार्यक्रमासाठी ‘आग्रहा’चं निमंत्रण!
दरम्यान, भाषणातच शरद पवारांनी फलटणच्या कार्यक्रमाचं आमंत्रण आल्याचं सूचक शब्दांत सांगितलं. “मी जास्त काही बोलत नाही. चित्र बदलतंय. आज हा कार्यक्रम झाला. निघायच्या वेळी आणखी कुठूनतरी फोन आला. त्यांनी हट्ट केली की इंदापूरला तुम्ही आले, १४ तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. मी विचारलं काय कार्यक्रम आहे? तर ते म्हणाले इंदापूरला जो कार्यक्रम आहे तोच कार्यक्रम आहे. मी विचारलं कुठे? तर ते म्हणाले फलटणला. समजलं का? त्यामुळे आता यानंतर फलटण. त्यानंतर पुढचा महिनाभर जवळपास सगळे दिवस बुक झाले आहेत. लोकांच्या मनात हा विचार आहे की एकत्र आलं पाहिजे. परिवर्तन झालं पाहिजे”, असं ते म्हणाले.
शरद पवारांनी जाहीर केला पहिला उमेदवार; व्यासपीठावरूनच म्हणाले, “यांना तुम्ही विधानसभेत पाठवा!”
पुढच्या महिन्याभरातल्या तारखा बुक झाल्याचं सूचक विधान करताना शरद पवारांनी आगामी काळात पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार असल्याचेच सूतोवाच केल्याचं आता बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून रामराजे नाईक निंबाळकर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. पक्षाध्यक्ष अजित पवार यांना आपली बाजू सांगितल्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत निर्णय घेण्याचे सूतोवाच त्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी उल्लेख केलेल्या फलटणच्या कार्यक्रमाचा रोख हा रामराजे नाईक निंबाळकर यांच्याच दिशेने असल्याचा तर्क लावला जाऊ लागला आहे.