लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रातील जनतेला आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या तयारीविषयी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. शरद पवार म्हणाले, “आता आमचं एकच लक्ष्य आहे. अर्जुनाचं जसं पोपटाच्या डोळ्यावर लक्ष होतं. तसंच आमचं आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तिन्ही पक्ष मिळून आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.”

शरद पवार म्हणाले, “नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या निवडणुकीत आम्ही आमच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटप केलं होतं. परंतु, आगामी निवडणुकीत आम्हाला आमच्या मित्रपक्षांना देखील जागा द्यायच्या आहेत. आमच्याबरोबर कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर लहान पक्ष देखील आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना जागा देता आल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांचादेखील मानसन्मान करणार आहोत. आमच्या सहकाऱ्यांच्या हिताची जबाबदारी आम्हीच घ्यायला हवी आणि आम्ही त्यांना आमच्याबरोबर घेऊन पुढे जाणार आहोत. आमच्या तीन पक्षांमध्ये अद्याप जागावाटपासंदर्भात कोणत्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत. लवकरच आम्ही बोलणी करून जागांची वाटणी करू. त्यानंतर मिळालेल्या जागांवर त्या त्या पक्षाने आपापले उमेदवार निश्चित करून कामाला लागायचं आहे.”

राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले, “आम्ही काही प्रमाणात तयारीला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीला तीन महिने बाकी आहेत. याचा अर्थ आमच्याकडे तयारीसाठी तीन महिने आहेत आणि या तीन महिन्यात आम्ही जोरदार मोर्चेबांधणी करू. महाविकास आघाडीच्या जागावाटपात आम्हाला ज्या ज्या जागा मिळतील तिथे पुढील तीन महिन्यांत काम करू. या तीन महिन्यांचा पुरेपूर फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. सध्या महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज आहे आणि जनतेची ही गरज भागवणे, त्यासाठी उचित भूमिका पार पाडणे हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही त्या दृष्टीने कामाला लागू.”

हे ही वाचा >> “…तर आपण अराजकतेकडे जाऊ”; पुण्यातील पोर्श कार अपघातावरून राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप!

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत, आमचा सामूहिक चेहरा लोकांसमोर ठेवून आम्ही पुढे जाणार आहोत.” शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटल्यामुळे चार वेगवेगळे गट तयार झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत शरद पवार गटात दुसऱ्या फळीतील नेत्यांना, कार्यकर्त्यांना संधी मिळेल का? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “जागा वाटपानंतर आम्हाला कोणत्या जागा मिळतात ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर आम्हाला ज्या ज्या जागा मिळतील, तिथे आम्ही तयारीला सुरुवात करू. यामध्ये आम्ही नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणार आहोत.”