चिपळूण येथे भरत असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी वादग्रस्त जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची निवड झाल्यामुळे तसेच संमेलनाच्या संयोजनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचाही लक्षणीय सहभाग असल्यामुळे एकंदरीत या संमेलनात ‘राष्ट्रवादी’च्या घडय़ाळाचीच टिकटिक ऐकू येणार आहे.
येत्या जानेवारीत होणाऱ्या या संमेलनासाठी चिपळूणची लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर यजमान संस्था आहे. पुढील वर्षी हे वाचनालयही दीडशेव्या वर्षांत पदार्पण करत आहे. त्यामुळे वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाने विविध महत्त्वाकांक्षी योजना आखल्या आहेत. त्या साकार करण्यासाठी निधी उभारणीच्या दृष्टीने या संमेलनाकडे संयोजक पाहात आहेत. गेल्या आठवडय़ात केंद्रीय कृषिमंत्री पवार यांचे नाव संमेलनाचे उद्घाटक म्हणून जाहीर झाल्यानंतर त्याच दृष्टिकोनातून या निवडीकडे पाहण्यात आले. त्यापाठोपाठ आता जलसंपदा खात्यातील घोटाळे आणि व्यक्तिगत व्यवहारांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे जलसंपदामंत्री तटकरे यांना स्वागताध्यक्ष करून स्थानिक संयोजन समितीने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याचे नावही स्पष्टपणे जाहीर न करता स्वागत समितीच्या बैठकीबाबतच्या पत्रकात निसटत्या उल्लेखाव्दारे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे येथील साहित्यिक वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या सावर्डे या गावी येत्या १ व २ डिसेंबर रोजी साहित्य संमेलनपूर्व कार्यक्रमांतर्गत मिनी संमेलन आयोजित करण्यात आले आहे, तर जानेवारीत होणाऱ्या मुख्य संमेलनाच्या समारोपाला माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा