सातारा: शरद पवारांच्या हातात प्रदीर्घ काळ केंद्र व राज्याची सत्ता असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का निकाली निघाला नाही, उलट त्यांनी हा प्रश्न चिघळवला. त्यांनी अल्पउत्पन्न गटातील मराठा समाजाचे मोठे नुकसान केल्याचा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
शेंद्रे (ता. सातारा) येथे सातारा मतदारसंघाचा महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. या वेळी खासदार उदयनराजे भोसले, सुनील काटकर, ॲड. दत्ता बनकर, विक्रम पवार, आदी उपस्थित होते.
शरद पवार अनेक वर्षे राजकारणात आहेत. मात्र, त्यांनी मराठा समाजाला राजकारणासाठी दुय्यम लेखले. गावागावांत राहणाऱ्या मराठा आणि ओबीसी समाजात व जाती-जातींमध्ये वाद निर्माण केले. पिढ्यान् पिढ्या मराठा आणि ओबीसी समाज गावागावांमध्ये, वाडी-वस्तीवर एकत्र आणि गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र, पवारांच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील एकोपा बिघडला आहे. त्यांनी सर्व समाजांना आणि महाराष्ट्राला विकासापासून दूर ठेवल्याची टीकाही शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
आम्ही संविधान बदलणार, आरक्षण काढून घेणार अशा अफवा विरोधकांकडून पसरवल्या जात आहेत. पंतप्रधान मोदी यांनी संविधानाला कोणाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका मांडली. मोदी यांनी केवळ निवडणुकीपुरती कोणतीही योजना सुरू केली नाही. त्यांच्याच आदर्श घेऊन महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – शरद पवारांना फोडाफोडीचे नोबेल पारितोषिकच दिले जावे, खासदार उदयनराजेंचा टोला
उदयनराजे भोसले म्हणाले, ‘सातारा मतदारसंघाच्या विकासासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मी कोठेही कमी पडणार नाही. आम्ही दोघेही कधीही स्वार्थी विचार करत नाही. मात्र, जनतेच्या हिताचे निर्णय होणे अपेक्षित आहे. महायुतीच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून देशाची आंतरराष्ट्रीय आणि देश पातळीवर वेगळी ओळख झाली आहे. त्यामुळे मतदारांनी याचा सांगोपांग विचार करून विधानसभेला शिवेंद्रसिंहराजेंना निवडून द्यावे. विरोधकांना जी टीका करायची आहे, त्याचे उत्तर कामातूनच दिले जाईल. एके काळी महाराष्ट्रात कॉंग्रेसची सत्ता होती. मात्र, गेल्या दहा वर्षांत असे काय घडले, की लोकांनी भारतीय जनता पक्षाला मनापासून स्वीकारले. छत्रपती शिवरायांनी नेहमी जातीपातीचा कधीच विचार केला नाही. तसेच आम्ही कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. जिल्ह्यात महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील यासाठी आपण सर्वजण एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.