केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा कायद्यामुळे देशातील सत्तर टक्के जनतेला अन्न मिळणार आहे. मात्र या योजनेची कोणी कितीही टिमकी वाजवून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेच या योजनेचे खरे शिल्पकार आहेत, असा दावा करत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी मित्रपक्ष काँग्रेसलाच लक्ष्य केले.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा वाढदिवस श्रीगोंदे येथे आज साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पाटील बोलत होते. सदाशिव पाचपुते, जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रतिभाताई पाचपुते, युवा नेते विक्रम पाचपुते, महानंदच्या अध्यक्ष वैशाली नागवडे, आमदार अरुण जगताप, चंद्रशेखर घुले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस आदी या वेळी उपस्थित होते.
पाटील यांनी विरोधक भाजप-शिवसेनेबरोबरच मित्रपक्ष काँग्रेसवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, शरद पवार यांनी देशातील शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले. अन्न सुरक्षा कायदा हीसुद्धा त्यांचीच संकल्पना आहे. ही गोष्ट कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. याबाबत कोणी कितीही जाहिरात केली म्हणून फरक पडणार नाही. बबनराव पाचपुते हे एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आले. राजकारणात विविध पदांवर त्यांनी काम केले. दुष्काळात त्यांनी नगर जिल्ह्य़ातील शेतक-यांसाठी मंत्रालयातील प्रत्येक बैठकीत विविध प्रश्न मांडले.
पाचपुते म्हणाले, सत्ता हे साधन आहे, साध्य नाही. मी सत्तेला फार महत्त्व दिले नाही. देशाचे नेते शरद पवार व राज्याचे नेते अजित पवार यांच्या आदेशानुसार काम करणे एवढेच घ्येय आहे. दीनदलित, गरीब शेतकरी, शेतमजुरांची सेवा करण्यातच आनंद आहे. बाबासाहेब भोस, जयश्री नागवडे, घनश्याम शेलार यांची भाषणे झाली.
 

Story img Loader