माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले. ठाकरे सरकारने शेवटच्या बैठकीत औरंगाबाद तसेच उस्मानाबाद शहराचे नामांतराचा निर्णय घेतला. औरंगाबादचे नाव संभाजी नगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्यात आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात २०१९ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाआघाडी सरकारने सुरुवातीलाच किमान समान कार्यक्रमात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा विषय नव्हता. सरकारच्या अखेरच्या मंत्रिमंडळात घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाबाबत आमच्याशी कुठलाही संवाद झालेला नव्हता. त्याबाबतची माहिती आम्हाला नव्हती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. याबाबत विचारले असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

“सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे अशी…”; एकनाथ शिंदे गटाविरुद्धच्या न्यायालयीन लढाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

“शरद पवारांनी एवढंच म्हटले आहे की आमच्यासोबत संवाद साधला नाही. त्यांनी निर्णयाला विरोध केलेला नाही. मंत्रीमंडळाच्या बैठकीत दोन्ही पक्षाचे मोठे नेते उपस्थित होते आणि हा प्रस्ताव मंजूर झाला आहे,” असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

दरम्यान, संभाजीनगर नामांतराच्या विषयावर बोलताना पवार म्हणाले की, शहरांची नावे बदलल्याने काही होत नसते. त्याचा काही उपयोग नाही. त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटची ठरलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्याविषयी आम्हाला माहिती नव्हते, परंतु मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा मंत्रिमंडळाचा आहे, असा मानण्याचा प्रघात आहे.