Sharad Pawar on Ajit Pawar: शरद पवारांनी आर. आर. पाटील यांच्याबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानाचा आज निषेध केला. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचं नाव घेत टीका केली होती. आज शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिदेत प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांच्या विधानाबाबत विचारणा केली असता त्यावर शरद पवारांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तसेच, सिंचन घोटाळ्याचा मुद्दा आम्ही उपस्थित केला नसून त्यांनीच उपस्थित केला अशा आशयाचं विधान त्यांनी अजित पवारांबाबत केलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रचाराच्या तोफा काहीशा थंडावल्या असल्या, तरी येत्या सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यानंतर पुन्हा एकदा प्रचाराचा जोर वाढू शकतो. मात्र, दिवाळीदरम्यान प्रचार थंडावला असला तरी दिवाळीआधी अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद उमटत आहेत.

नेमका काय आहे मुद्दा?

अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी सांगली येथे जाहीर प्रचारसभेत ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. “आबांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत मी त्यांना पाठबळ देत होतो, मागेल ते पद व गोष्टी आबांना मिळवून दिल्या. सिंचन घोटाळ्याचा माझ्यावर आरोप झाल्यानंतर गृहमंत्री म्हणून या प्रकरणाची खुली चौकशी करण्यासाठी आबांनी सही केली आणि निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याच्या सहीने त्याची चौकशी सुरू होणार होती. यानंतर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून घेत तुमच्या आबांनी तुमच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सही केली आहे हे मला दाखवले. याचा मला धक्का बसला. आबांनी माझे काय चुकले असेल म्हणून सही केली”, असं अजित पवार म्हणाले होते.

शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी

दरम्यान, आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अजित पवारांच्या या विधानावर भाष्य केलं. “सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही कुणी केलेला नाही. हा मुद्दा कुणी काढला हे मी सांगायची गरज नाही. आम्ही एकाच गोष्टीसाठी अस्वस्थ आहोत की महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत स्वच्छ व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा लौकिक होता अशा स्वच्छ राजकारणी व नेत्याच्या बाबतीत आज पुन्हा उलटसुलट चर्चा होत आहे. हे घडलं नसतं तर आनंद झाला असता”, असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar: शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”

“जी व्यक्ती जाऊन ९ वर्षं झाली आणि ज्यांचा लौकिक सबंध देशात अत्यंत स्वच्छ व प्रामाणिक नेता अशी आहे त्यांच्याबाबतीतली चर्चा आज करणं योग्य नव्हतं. पण ठीक आहे. सत्ता हातात असताना काहीही बोलायला आपण मुक्त आहोत असा समज काही घटकांचा असतो. कदाचित हा त्याचाच एक भाग असेल”, अशा शब्दांत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली.

फडणवीसांनी गोपनीयतेच्या तत्वाचा भंग केला?

दरम्यान, आर. आर. पाटील यांनी सही केल्याचा मुद्दा अजित पवारांना सांगून देवेंद्र फडणवीसांनी गोपनीयतेच्या तत्त्वाचा भंग केल्याची टीका होत आहे. त्यावर शरद पवारांनी भाष्य केलं. “फडणवीसांचा खुलासा मी वाचला आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही माहिती मागायचा कुणालाही अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी ती दाखवली असं त्यांचं म्हणणं आहे. मी शासनात थोडं काम केलंय. त्यांच्याइतकं कदाचित केलं नसेन. पण मी जे पाहिलं आहे, त्यात आम्ही सदनाचे सदस्य होताना राजभवनावर शपथ घेतो. त्या शपथेत स्पष्ट उल्लेख आहे की अशा गोष्टी मी कुणालाही दाखवणार नाही किंवा त्याबाबत कुठलंही स्पष्टीकरण देणार नाही. हे मी अनेकदा पाहिलं आहे. मी सात वेळा शपथ घेतली. त्या सातही वेळेच्या शपथेमध्ये हे वाक्य होतं”, असं ते म्हणाले.

Live Updates