सत्ताधारी महायुतीतील घटकपक्ष असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अमरावती जिल्ह्यात भेट होणार आहे. त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत परत येणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, यावर आता शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीत बच्चू कडू नाराज आहेत, त्यांना महाविकास आघाडीत आणण्यासाठी काही प्रयत्न करणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “मी बच्चू कडूंच्या घरी जातोय, त्यात काहीही राजकीय हेतू नाही. मला चहासाठी बच्चू कडू यांनी आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे मी जात आहे. एका विधानसभेच्या सदस्यानं चहासाठी बोलावलं, तर एवढी चर्चा करण्याची गरज नाही.”

हेही वाचा : “…तर युतीत फूट पडायला वेळ लागणार नाही”, शिंदे गटातील नेत्याचा भुजबळांना इशारा

“प्रकाश आंबेडकरांबरोबर एकत्र जाऊ”

प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’ आघाडीत कधी सामावून घेणार? या प्रश्नावर शरद पवारांनी म्हटलं, “मला माहिती नाही. पण, इंडिया आघाडीच्या बैठकीत मी मल्लिकार्जुन खरगे यांना प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधून त्यांच्यासह निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करावे, असं सांगितलं आहे. मात्र, आमची सगळ्यांची इच्छा आहे की, प्रकाश आंबेडकरांबरोबर एकत्र जाऊ.”

हेही वाचा : बच्चू कडू महाविकास आघाडीत परतणार? अमरावतीत शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता, यशोमती ठाकूर म्हणाल्या…

“…अन् मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड झाली”

‘विरोधकांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चेहरा नाही,’ असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. याबद्दल विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “ठिकंय, त्यांना तसं वाटत असेल. पण, अनेक चेहरे पंतप्रधानपदासाठी असल्याचं आम्हाला वाटतात. चेहऱ्याची आवश्यकता वाटत नाही. १९७७ च्या निवडणुकीपूर्वी कुणी पंतप्रधानपदासाठी नाव दिलं नव्हते. निवडणूक झाल्यावर जनता पक्ष स्थापन झाला आणि मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड झाली.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar meet bacchu kadu join mahavikas aghadi ssa