राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये तब्बल तासभर या दोन्ही शीर्षस्थ नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणत्या बाबींवर चर्चा झाली, याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सहकार क्षेत्राविषयी ही भेट झाल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जरी सांगितलं असलं, तरी त्यावर राजकीय विश्लेषक आणि इतरांचा विश्वास बसलेला नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या भेटीसंदर्भात ट्वीट करून खोचक टोला लगावला आहे. तसेच, या भेटीचा थेट संबंध राज्याच्या राजकारणाशी जोडला आहे. त्यामुळे या भेटीनंतर राज्यातल्या राजकारणाची हवा चांगलीच तापू लागली आहे.
अंजली दमानिया म्हणतात…
अंजली दमानिया आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “१५ जुलैला फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?), १६ जुलैला फडणवीस दिल्लीला जातात, १७ जुलैला शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”.
15 जुलै फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?)
16 जुलै फडणवीस दिल्ली ला जातात
17 जुलै शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात.
महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही— Mrs Anjali Damania (@anjali_damania) July 17, 2021
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट, तासभर झाली चर्चा; तर्क-वितर्कांना उधाण!
जयंत पाटलांनी सांगितलं कारण
जयंत पाटील यांनी या भेटीमागे सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं. “देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
“…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”,वाचा सविस्तर
Nationalist Congress Party leader Sharad Pawar calls on Prime Minister Narendra Modi in Delhi pic.twitter.com/NuDCpGQSn8
— ANI (@ANI) July 17, 2021
शरद पवारांची पंतप्रधानांशी तासभर चर्चा
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.