Sharad Pawar : जुलै २०२३ या महिन्यांत अजित पवारांनी शरद पवारांशी फारकत घेतली आणि महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार यांनी जे भाषण ५ जुलै २०२३ ला केलं होतं त्यात त्यांनी शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. वय ८१, झालं ८२ झालं तुम्ही थांबणार की नाही? आम्ही काम करतो तुम्ही मार्गदर्शन करा. या आशयाचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. आज हाच मुद्दा उपस्थित करत माझं वय ९० झालं तरीही होऊ द्या हे म्हातारं काही थांबणार नाही असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले शरद पवार?

आपल्यापुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा? सामान्य लोकांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा की आणखी कुणाच्या हातात द्यायचा? आज सांगितलं जातं की आम्ही नवीन नवीन योजना काढल्या. रोज वर्तमानपत्र उघडलं की नवीन योजना बघायला मिळतात. कधी बहिणीबाबत असतात. कुठल्याही व्यक्तीला बहिणीबाबत आस्था असतेच. बहीण ही कुटुंबातली जिवाभावाची व्यक्ती असतेच. बहिणीचा सन्मान केला तर माझ्यासारख्याला, तुम्हाला आणि सगळ्यांना मनापासून आनंद होतो. पण एक गंमत आहे बघा मागच्या दहा वर्षांत बहीण आठवली नाही. पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य होतं तेव्हा बहीण दिसली नाही. नंतरच्या काळात बहीण दिसली नाही. बहीण दिसली कधी? लोकसभेला महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या म्हणून बहीण आठवली. असा टोला शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी लगावला.

हे पण वाचा- Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का; विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेल्या आमदारासह ‘या’ नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’

बारामतीतही एक बहीण उभी होती

पण एक सांगतो, तुमच्यापेक्षा बारामतीकर हुशार आहेत. तिथे एक बहीण उभी होती. ती निवडणुकीला उभी राहिल्यानंतर कुणी काहीही म्हणो बारामतीकर निवडणूक प्रचाराला गेलो की गप्प बसायचे. मी म्हटलं झालं काय? कुणी काही बोलत नाही. मतमोजणी झाली तेव्हा कळलं की १ लाख ६० हजार मतं बहिणीला बारामतीकरांनी दिली. याचा अर्थ हा आहे की लोक राजकारण्यांपेक्षा जास्त शहाणे आहेत. लोकांना कळतं काय करायचं? कुणासाठी करायचं आणि कधी करायचं. आज महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातात द्यायची त्याचा विचार करण्याची गरज आहे. मी काही निवडणुकीला उभा नाही. १४ वेळा निवडणुकीला सामोरा गेलो. सातवेळा दिल्लीची आणि सातवेळा महाराष्ट्राची. सालगड्याला पण सुट्टी देतात पण मला कुणी सुट्टीच दिली नाही, असंही शरद पवार ( Sharad Pawar ) त्यांच्या भाषणात म्हणाले.

हे म्हातारं ९० वर्षांचं झालं तरीही..

आत्ता या ठिकाणी काही तरुण मुलं माझा फोटो असलेला बोर्ड घेऊन उभे होते. माझ्या फोटोच्या खाली लिहिलं होतं, ८४ वर्षांचा म्हातारा. तुम्ही काही काळजी करु नका. अजून लांब बघायचं आहे. ८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही, तुम्ही काही काळजी करु नका. ज्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला त्यांचे मी आभार मानतो असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar mentioned his age and made very imp statement about maharashtra scj