अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा समावेश त्यांनी केला होता. आगामी विधानसभा निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘मी काही नवखा नाही’, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. यासंदर्भात आज शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली असता त्यांनी खोचक शब्दांत त्यावर टिप्पणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते अजित पवार?

अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केल्यानंतर अजित पवारांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं. “मी काही आज अर्थसंकल्प सादर करत नाहीये. या सगळ्या गोष्टींमध्ये मी नवखा नाही. यावेळी मी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे. सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊन, केंद्र सरकारचं खर्चासंदर्भातलं ३ टक्क्यांचं बंधन लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे”, असं अजित पवार शुक्रवारी म्हणाले होते.

शरद पवार म्हणतात, “अर्थसंकल्प फुटला”!

दरम्यान, शरद पवारांनी या अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प फुटल्याचं विधान केलं आहे. “अर्थसंकल्पसंदर्भातली माहिती आधी बाहेर येता कामा नये. कारण त्याला अर्थसंकल्प फुटला असं म्हणतात. काल अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत अर्थसंकल्पात काय काय येणार आहे, ते छापून आलं होतं. मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांना अमुक रक्कम दिली जाईल, वारीतील दिंडीला २० हजार रुपये अशा अनेक गोष्टी विधानभवनात मांडण्यापूर्वीच बाहेर आल्या होत्या. याचा अर्थ स्पष्ट आहे. अर्थसंकल्पाची गुप्तता पाळली गेली नाही”, असं शरद पवार म्हणाले.

“तरतुदी लोकांपर्यंत पोहोचायला कितीतरी महिने लागतील”

“अर्थसंकल्प पाहता असं दिसतंय की ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाही, येण्याची तरतूद नाही अशा गोष्टी त्यात सांगण्यात आल्या आहेत. पूर्ण अर्थसंकल्प ३ महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून मांडला आहे. सर्व तरतुदी लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागतील. तरतूद कमी रकमेची करायची आणि प्रत्यक्षात सुचवायचं अधिक रक्कम दिली जाईल. म्हणजे जमा, महसुली तूट आणि लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींचे आकडे पाहिले तर आवश्यकतेपेक्षा कितीतरी कमी निधीची उपलब्धता आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प लोकांना काहीतरी भयंकर करतोय असं दाखवणारा आहे. पण माझी खात्री आहे की लोकांचा यावर विश्वास बसणार नाही. या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कितपत होईल, याची शंका मला आहे”, असं शरद पवार म्हणाले.

Maharashtra Assembly Budget 2024-2025: “तुफानों में सँभलना जानते हैं”, अजित पवारांची विधानसभेत शेरोशायरी; नेमका रोख कुणाकडे? तर्क-वितर्कांना उधाण!

अजित पवारांच्या विधानाचं काय?

दरम्यान, यावेळी माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांच्या ‘मी काही नवखा नाही’ विधानाबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर टोला लगावला. “एखाद्या गोष्टीवर मी १०० रुपये खर्च करणार म्हटलो आणि माझ्या खिशात ७० रुपये आहेत, तर मग मी १०० रुपये खर्च कसे करणार? पहिला प्रश्न हा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे? दुसरं महसुली खर्च किती होणार आहे? आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार? याची तरतूद न करता खर्च करणार म्हटलं आणि विचारपूर्वक केलंय असं म्हटलं तरी त्याला फारसा काही अर्थ राहात नाही”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

“वीजमाफी म्हणताय, पण वीज मंडळांच्या स्थितीचं काय?”

“वीजमाफी दिलीच, तर आज वीजमंडळाची स्थिती काय आहे? त्यांना होणारा तोटा भरून काढण्याची तरतूद झाली नाही, तर ते राबवलं जाणार का? याची शंका आहेच”, असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar mocks ajit pawar budget speech in maharashtra assembly monsoon session pmw