राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आधी राजीनामा दिल्यामुळे, त्यानंतर तो मागे घेतल्यामुळे आणि आता त्यावर राजकीय वर्तुळातून उमटत असणाऱ्या प्रतिक्रियांमुळे! आता कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली खोचक टिप्पणी यामुळे शरद पवार पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी निपाणीत प्रचारसभेत बोलताना ‘राष्ट्रवादीचं पार्सल’ असा उल्लेख केल्यानंतर त्यावर आता शरद पवारांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राष्ट्रवादीचं पार्सल”
देवेंद्र फडणवीसांनी निपाणीतील प्रचारसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असा केला होता. “महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. या पक्षाने आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये त्यांचा एकच उमेदवार दिला आहे. तो उमेदवार निपाणीत आहे. हा पक्ष काय डोंबल करणार आहे इथे येऊन? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कुस्ती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिली जुली कुस्ती सुरू आहे”, असं फडणवीस म्हणाले होते. तसेच, “राष्ट्रवादी काँग्रेसचं पार्सल पॅक करून पाठवून द्या, आम्ही तिकडे बघून घेऊ”, असंही फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना उल्लेखून म्हणाले होते.
दरम्यान, फडणवीसांच्या या टोल्याचा शरद पवारांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना समाचार घेतला. “ते काहीही बोलू शकतात. त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते काहीही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करतात. त्यामध्ये काही लोक वाकबगार असतात. आजच मी इथे आल्यावर बघितलं. कुणीतरी एक पत्रक काढलंय. भाजपाच्या अध्यक्षांच्या सहीने आहे बहुतेक ते. त्यांचं म्हणणं असं आहे की रयत शिक्षण संस्थेत मी सभासद नसूनही त्या संस्थेचा ताबा घेतला. रयत शिक्षण संस्थेत गेली ४० वर्षं मी सभासद आहे. पण असं एक खुळचटपणाचं विधान एका जबाबदार पक्षाच्या नेतृत्वानं करणं याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
स्क्रिप्टेड राजीनामा नाट्य?
दरम्यान, भाजपाकडून शरद पवारांच्या राजीनाम्यावर ‘स्क्रिप्टेड’ अर्थात नियोजनपूर्वक घडामोडी अशी टीका केली असताना त्यालाही शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. “त्यांनी हे सांगत बसावं, आम्ही आमचं काम करत राहू. आम्ही आमच्या पक्षाचा विस्तार करू. त्यांनी अशा प्रकारचे प्रश्न मांडत बसावं. त्याची आम्हाला चिंता करण्याचं काही कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले.