महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकासआघाडी सरकार आणि राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच विसंवाद दिसून येत आहे. अनेक मुद्द्यावरून सत्ताधारी आणि राज्यपाल यांच्यात प्रसंगी आरोप-प्रत्यारोप देखील झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीवरून राजकारण रंगू लागलं आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप घेतला जात असताना राज्यपालांनी मात्र, या मुद्द्यावरून खोचक प्रतिक्रिया आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.
“सरकारच मागत नाही, तुम्ही कशाला मागता?”
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईतील बेलार्ड पिअर येथील कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शरद पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांनी १२ सदस्यांच्या मुद्द्यावर विचारणा केली असता शरद पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला. “मी राज्यपालांचं स्टेटमेंट वाचलं. त्यांनी कुणालातरी सांगितलं की सध्याचं सरकार यावर मागणी करत नाही, तुम्ही कशाला करता? उद्धव ठाकरेंचं पत्र यापूर्वीच त्यांच्याकडे गेलेलं आहे. नवाब मलिक स्वत: त्यांना पत्र देऊन आले आहेत. राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ देखील त्यांना या मुद्द्यावर भेटून आलं आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“आता आम्ही बोलणंच सोडून दिलं”
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “यासंदर्भात सरकारचं पत्र राज्यपालांकडे गेलं आहे. कदाचिक वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल. पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. आम्ही आता त्यावर बोलतही नाही. आपल्याकडे म्हण आहे की शहाण्याला शब्दांचा मार. पण शहाण्यांना! त्यामुळे उगीच कुठेही शब्द वाया घालवणं गरजेचं नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
१२ सदस्यांच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची खोचक प्रतिक्रिया! अजितदादांकडे हात करून म्हणाले…!
राज्यपालांनी मारला होता टोमणा
देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते पुण्यात विधानभवन येथे ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी राज्यपालांना १२ सदस्यांच्या नियुक्तीविषयी विचारणा केली. तेव्हा, राज्यपालांनी हजरजबाबीपणे उत्तर देऊन वेळ मारून नेली.
यावेळी आपल्या मागेच उभ्या असलेल्या अजित पवार यांच्याकडे हात दाखवून राज्यपाल म्हणाले, “हे माझे मित्र आहेत. सरकार आग्रह धरत नाही, तर तुम्ही का धरता?” असा उलट खोचक सवाल राज्यपालांनीच केला. त्यासंदर्भात आज शरद पवारांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.