सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारकडे केली आहे. यासाठी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत देण्यात आली आहे. तर, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याप्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
“शरद पवारांनी एका पत्रात ५२ जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. त्यामुळे खरे ओबीसी नेते शरद पवार आहेत,” असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं आहे. बच्चू कडूंनी गुरूवारी मनोज जरांगे-पाटील यांची रूग्णालयात भेट घेतली. तेव्हा ‘टीव्ही ९ मराठी’शी ते बोलत होते.
मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या मुदतीबद्दल सरकारचं शिष्टमंडळ जरांगे-पाटलांची भेट कधी घेणार? याबद्दल विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, “सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे-पाटलांची भेट घेऊन चर्चा करायला हवी होती. जरांगे-पाटलांनी आंदोलन मागे घेतलं नसते, तर सरकारला परिणाम भोगावे लागते असते. सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे.”
हेही वाचा : एकनाथ शिंदेंबरोबर कधीपर्यंत राहणार? बच्चू कडूंचे सूचक वक्तव्य
शिष्टमंडळ न येण्यामागे ओबीसी नेत्यांचा दबाव दिसतो का? असं विचारल्यावर बच्चू कडूंनी म्हटलं, “दबावाचे कारण नाही. थोडीच अमेरिकेतून आणलेल्या लोकांना ओबीसीमधून आरक्षण देतोय. मराठा समाज हा देशातीलच आहे. मराठा समाजाला गृहित धरूनच ओबीसी आरक्षण देण्यात आलं होतं. काहीजण पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ओबीसी आणि मराठा समाजाचं काही देणं-घेणं नाही.”
हेही वाचा : “सगळेच गद्दार, अजित पवार गट ‘खोके-खोके’ म्हणायचे, आता तेच…”, बच्चू कडूंचं मोठं विधान
“शरद पवारांनी एका पत्रामध्ये ५२ जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. खरे ओबीसी नेते शरद पवार आहेत. पण, ५२ जातींमध्ये मराठा समाजाचाही उल्लेख केला असता, तर प्रश्न मिटला असता,” असं बच्चू कडू म्हणाले .