मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. दिलेल्या वेळेत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत राज्यातील अनेक गावांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी राजकीय नेत्यांना बंदी घातली आहे. राज्यभरात याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर जाणार होते. बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवारांच्या हस्ते होणार होता. पण मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन अजित पवारांनी बारामती दौरा रद्द केला आहे. अजित पवारांनी दौरा रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

हेही वाचा- गुणरत्न सदावर्ते भाजपाचा माणूस? रावसाहेब दानवेंचं मोठं विधान, म्हणाले…

“मराठा समाजाची आरक्षणाबाबत काहीतरी भावना आहे, अशावेळी तिथे संघर्ष टाळणं, हे शहाणपणाचं लक्षण आहे. माझ्या मते अजित पवारांनी जो निर्णय घेतला, तो योग्य निर्णय होता,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवारांनी बारामती दौरा रद्द केल्यानंतर ते पुण्यातील शिवाजीनगर भागातील जिजाऊ निवासस्थानी दाखल झाले. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on ajit pawar canceled baramati visit malegaon sugar factory event manoj jarange maratha reservation rmm