“दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हाचलाची सुरू आहेत”, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात बरीच चर्चा रंगली. त्यातच, मुख्यमंत्री सध्या साताऱ्यात असल्याने ते नाराज होऊन साताऱ्यात गेले असल्याच्या चर्चांनाही जोर आला आहे. त्यामुळे संजय राऊतांनी केलेला गौप्यस्फोट खरा ठरतोय की काय अशी शंका राजकीय वर्तुळातून उपस्थित केली जात आहे. या सर्व प्रश्नांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांना थोडक्यात पण स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्ली सुरू असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे, याबाबत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की, “मला काही माहिती नाही. मुख्यमंत्री बदलायचा निकाल आम्हाला सांगायचं कोणाला कारण नाही. असं काही आहे असं माझ्या कानावरही नाही. हे राऊतांचं स्टेटमेंट असलं तरी ते पत्रकार आहेत ते तुम्हा पत्रकार लोकांना अधिक माहिती असते.”
“मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल”, असं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून ते मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक असल्याची चर्चा सुरू झाली. तसंच, ठिकठिकाणी त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही पोस्टर लागलेले आहेत. यावरून पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी अवघ्या एका वाक्यात उत्तर दिलं आहे. “भावी मुख्यमंत्र्याच्या पोस्टरवरून अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे की असा वेडेपणा करू नका.” तसंच, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असल्याबाबत कोणता प्रस्ताव गेला आहे का? असाही प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की, “यासंदर्भात उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. “
हेही वाचा >> बारसू रिफायनरीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक असल्याची चर्चा, त्यानंतर संजय राऊतांनी मुख्यमंत्री बदलाबाबत केलेला गौप्यस्फोट, तसंच, अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले पोस्टर आणि एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवरून महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या दिशेने जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांची भूमिका काय आहे असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्यावर शरद पवारांनी आज थोडक्यात उत्तरे देऊन प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे.