Anil Deshmukh Attack : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवारी रात्री अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना काटोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे. नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्यानजिक ही घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.
काटोल मतदारसंघात अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे उमेदवार आहेत. प्रचाराच्या अखरेच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदारसंघात प्रचारात सक्रीय होते. संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती. ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत ते कारने काटोलकडे निघाले होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली. यामध्ये देशमुख जखमी झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, या घटनेनंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला. तसेच अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला प्रतिसाद मिळतोय हे काही प्रवृत्तींना सहन होत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Nagpur, Maharashtra | NCP-SCP leader Anil Deshmukh alleges that some people pelted stones at his car on Katol Jalalkheda Road in Katol Assembly Constituency. He suffered injuries in the incident and is being taken to a nearby hospital.
— ANI (@ANI) November 18, 2024
Anil Deshmukh's son Salil is contesting the… pic.twitter.com/lwAuzCvOxs
हेही वाचा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक, राजकीय वर्तुळात खळबळ
शरद पवार काय म्हणाले?
“अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. काटोलमध्ये ज्या पद्धतीचा लोकांचा अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला प्रतिसाद मिळत आहे. हे काही प्रवृत्तीना सहन होत नाही. आज अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या डोक्याला लागलं आहे. त्यांच्या डोक्यामधून रक्त येत असल्याचं दिसत आहे. आरोप-प्रत्यारोप ठीक आहे. मात्र, अशा प्रकारचा हल्ला करणं हे अयोग्य आहे. याचा मी निषेध करतो, असं शरद पवार यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले. या… pic.twitter.com/vo8U3uoqoH
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 18, 2024
सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं?
प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर काही समाज कंटकांनी भ्याड हल्ला केला. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.