Sharad Pawar On Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीला ओबीसींचा विरोध आहे. तसेच ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते गैरहजर राहिले. त्यामुळे यासंदर्भात काहीही ठोस निर्णय झाला नाही. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी सिव्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली.
या भेटीत मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचं भुजबळांनी सांगितलं. आता भुजबळांच्या भेटीबाबत शरद पवारांनी भाष्य केलं आहे. “छगन भुजबळांचं बारामतीमधील भाषणं चांगलं झालं, त्यांनी माझ्याबद्दल प्रचंड कौतुक व्यक्त केलं. तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवारांची गरज आहे, असं मार्गदर्शन मला त्यांनी भेटीदरम्यान केलं”, असं म्हणत शरद पवारांनी भुजबळांना खोचक टोला लगावला. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा : अजित पवार परत आले तर पक्षात घेणार का? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “घरात सर्वांना जागा, पण…”
शरद पवार काय म्हणाले?
“छगन भुजबळ यांची हल्ली दोन-तीन भाषणं फार चांगली झाली. मला भेटण्याच्या आधी एक दिवस ते बारामतीला गेले होते आणि बऱ्याच गोष्टी ते बोलले. त्याआधी ते बीडला गेले होते. तिथेही छगन भुजबळांनी चांगल्या प्रकारचं भाषण केलं. बीड आणि बारामती येथील दोन्हीही भाषणामध्ये त्यांनी माझ्याबद्दल प्रचंड आस्था व्यक्त केली आणि कौतुक व्यक्त केलं”, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला.
शरद पवार पुढे म्हणाले, “बारामतीमधील त्यांच्या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी ते मला भेटायला आले. मला थोडं बर वाटत नव्हतं. थोडा ताप होता म्हणून मी दोन दिवस सुट्टी काढली होती. मला झोपेतून उठवलं आणि सांगितलं की छगन भुजबळ आले आहेत. मी विचारलं की कधी आलेत, तर मला सांगण्यात आलं की एक तास झाला. मी म्हटलं एक तास? मग मला सांगितलं की ते बोलले की भेटल्याशिवाय जायचंच नाही. त्यानंतर छगन भुजबळ आले आणि मला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की या-या गोष्टी केल्या पाहिजेत. तरच महाराष्ट्राचं हित आहे. आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवारांची गरज आहे, असं मार्गदर्शन मला छगन भुजबळांनी केलं. ही गोष्ट नाकारता येत नाही”, असा मिश्किल टोला शरद पवार यांनी छगन भुजबळांना लगावला.
भुजबळ बारामतीच्या भाषणात काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा बारामतीत काही दिवसांपूर्वी मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. छगन भुजबळ म्हणाले होते, “आरक्षणासाठीच्या सर्वपक्षीय बैठकीला सर्वजण येणार होते. पण बारामतीमधून एक फोन गेला आणि सगळ्यांनी सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला”, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा रोख शरद पवार यांच्याकडे असल्याची चर्चा यानंतर रंगली होती.