Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी पार पडली. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर तब्बल एका आठवड्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गुरुवारी हा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडला. आता सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार बाकी असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईत आझाद मैदानावर मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र, या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षातील शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं का? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात आला होता. मात्र, शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं, अशी माहिती महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आली.
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहण्याचं कारण काय होतं? यावर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देत कारण सांगितलं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांना महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण तुम्हाला देण्यात आलं होतं का? असं विचारलं असता शरद पवार यांनी म्हटलं की, ‘स्वत: मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. मात्र, संसदेचं अधिवेशन सोडून येणं शक्य नव्हतं, म्हणून मी आलो नाही’, असं कारण शरद पवारांनी सांगितलं.
शपथविधीला न येण्याचं कारण काय?
दरम्यान, शरद पवार यांनी महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याबद्दलचं कारण सांगताना म्हटलं की, “मला मुख्यमंत्र्यांचा (देवेंद्र फडणवीस यांचा) फोन आला होता. त्यांनी स्वत: फोन केला होता. पण संसदेचं अधिवेशन सुरु होतं. त्यामुळे संसदेचं अधिवेशन सोडून शपथविधी सोहळ्याला येणं शक्य नव्हतं. पण आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधी पक्षातील नेत्यांना आपण फोन करून शपथविधी सोहळ्यासाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं, असं आज स्पष्ट केलं. मात्र, ते त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव आले नसतील, असंही त्यांनी म्हटलं. मात्र, त्या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.