Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या राज्याच्या राजकारणात सुरु आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे युती, आघाडीसह सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरु आहे. दिग्गज नेते वेगवेगळ्या मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. सभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आंबेगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी भर सभेत दिलीप वळसे पाटलांचा गद्दार असा उल्लेख करत जाहीर इशारा दिला. “या विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना १०० टक्के पराभूत करा”, असं शरद पवार यांनी म्हटलं. तसेच दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो त्याला शिक्षा द्यायची असते, अशा शब्दांत शरद पवारांनी हल्लाबोल केला.
हेही वाचा : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”
शरद पवार काय म्हणाले?
“ज्यांना मी मदत केली, शक्ती दिली, ज्यांना अधिकार दिला, ज्यांचा मी सन्मान केला त्यांच्याकडून मला काहीही नको. मात्र, आज त्यांच्यावर मतदारसंघातील लोक नाराज आहेत. त्यांनी (दिलीप वळसे पाटील) आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही हे लोकांना आवडलेलं नाही. आमची साथ सोडली आणि आता तिकडे मंत्रिमंडळात बसले. आता ते लोकांना सांगतात, ते लोकांना खोटं बोलतात. ते लोकांना काय सांगतात? आमचे आणि शरद पवारांचे संबंध अजूनही चांगले आहेत. मात्र, अशी कोणतीही गोष्ट नाही”, असं शरद पवार म्हणाले.
“आता ते (दिलीप वळसे पाटील) सांगतात की निवडणुका आल्या आहेत. शरद पवार मतदारसंघात येतील. मात्र, माझ्याबाबत काहीही बोलणार नाहीत. आता त्यांच्याबाबत काय बोलायचं? त्यांनी बोलायला काय ठेवलंय? त्यांनी बोलायला काहीही ठेवलेलं नाही. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे त्यांनी गद्दारी केली. जो गद्दारी करतो त्या गद्दाराला शिक्षा द्यायची असते. या विधानसभेच्या निवडणुकीत माझा तुम्हाला एकच शब्द आहे. या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना १०० टक्के पराभूत करा”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीमधील फुटीनंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच आंबेगावच्या जाहीर सभेत अजित पवार गटातील नेत्यांवर गद्दार असा उल्लेख करत हल्लाबोल केला. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे देवदत्त निकम हे उमेदवार आहेत. या सभेत बोलताना शरद पवार यांनी देवदत्त निकम यांना विजयी करण्याचं आवाहन करत दिलीप वळसे पाटील यांचा १०० टक्के पराभव करण्याचं आवाहन केलं आहे.